
अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रिसर्च ऍण्ड इन्क्युबेशन फाऊंडेशन (एसआरआयएफ) आणि अमृत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत-एसआरआयएफ’ योजनेचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते आणि अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन झाले.
विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक, नवउद्योजक आणि स्टार्टअप्सना उद्योग-व्यवसाय क्षेत्रासाठी आवश्यक मार्गदर्शन, इन्क्युबेशन सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच उद्योजकता विकासासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद यादव, व्यवस्थापक अमोल हिरुळकर यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे संचालक, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच अमृतचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर आणि जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश कथलकर यांचीही उपस्थिती होती.
‘अमृत-एसआरआयएफ’ योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थी आणि नवउद्योजकांना आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे. नवकल्पना विकसित करणे, स्टार्टअप उभारणी, व्यवसाय मॉडेल तयार करणे, बाजारपेठेची समज विकसित करणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मेंटॉरिंग तसेच इन्क्युबेशन सुविधा यामुळे युवकांना सक्षम केले जाणार आहे.
एसआरआयएफकडून विद्यार्थ्यांच्या आणि संशोधकांच्या अभिनव कल्पनांचे स्टार्टअप व उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अमृतच्या सहकार्यामुळे या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार असून, युवकांना आपल्या कल्पनांचे प्रत्यक्ष व्यवसायात रूपांतर करण्यासाठी आवश्यक पाठबळ उपलब्ध होणार आहे.
‘नवकल्पनेतून उद्योजकता आणि उद्योजकतेतून रोजगारनिर्मिती’ या संकल्पनेला चालना देणारी ही योजना अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील स्टार्टअप आणि उद्योजकता परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. विद्यापीठातील संशोधन, नवकल्पना आणि उद्योगविश्व यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी या उपक्रमाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी