“कपिल सिब्बलांचे दावे बिनबुडाचे”- राहुल नार्वेकर
सर्वोच्च न्यायालयातील युक्तीवादांवर केले भाष्य यवतमाळ,18 ऑगस्ट (हिं.स.) : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद
राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष


सर्वोच्च न्यायालयातील युक्तीवादांवर केले भाष्य

यवतमाळ,18 ऑगस्ट (हिं.स.) : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेताना सिब्बल यांनी अध्यक्षांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडल्याचा दावा केला. परंतु, कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्षांनी दिली.

सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. नार्वेकरांना कोणता निष्कर्ष काढायचा आहे, हे आधीच माहीत होते आणि त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी गुंतागुंतीचा तर्क मांडण्यात आल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.“व्हिप आमच्याकडे होता. विधानसभा अध्यक्षांची निवड करू नये, असा व्हिप आम्ही जारी केला होता. मात्र, संबंधित आमदारांनी त्या व्हिपच्या विरोधात मतदान केले, असा मुद्दा सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडला.पक्षाच्या घटनेचा आधार घेत अध्यक्षांनी निर्णय दिल्याच्या मुद्द्यावरही सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयोगाच्या नोंदीमध्ये 1999 सालची पक्षघटना उपलब्ध असल्याने तिचा आधार घेण्यात आल्याचे अध्यक्षांचे म्हणणे आहे. मात्र, या सर्व बाबींमध्ये लक्ष घालण्याचे अधिकार अध्यक्षांना कोठून मिळाले? असा सवाल सिब्बल यांनी केला.

दरम्यान, यवतमाळ दौऱ्यावर असलेल्या राहुल नार्वेकरांनी सिब्बल यांच्या युक्तिवादावर प्रत्युत्तर दिले आहे. सिब्बल यांनी केलेले दावे बिनबुडाचे असल्याची टीका नार्वेकर यांनी केली. यासंदर्भात नार्वेकर म्हणाले की, कपिल सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात, यातून काही सिद्ध होत नसल्याचे नार्वेकर म्हणाले. आपण दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत राहूनच घेतल्याचा दावा त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांच्या आधारेच आपण निर्णय दिला असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. वकील आपल्या पक्षकाराच्या संदर्भात युक्तिवाद करतात याचा अर्थ ते जे म्हणत आहेत ते सत्य आहे, असा होत नसल्याचेही नार्वेकरांनी नमूद केले.

अध्यक्षांनी काय ठरवले, हे कपिल सिब्बल यांना कसे समजले, हा पहिला प्रश्न आहे. बिनबुडाचे आरोप केल्याने कोणताही फरक पडत नाही आणि आपण दिलेला निर्णय अत्यंत शाश्वत असल्याचा दावा नर्वेकरांनी केला.या निर्णयामध्ये कोणताही बदल होईल, असे आपल्याला वाटत नसल्याचेही राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून करण्यात येणारे युक्तिवाद आणि त्यावर नार्वेकरांकडून व्यक्त करण्यात आलेली भूमिका यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande