
पुणे, 18 ऑगस्ट (हिं.स.)। राज्याच्या युवा धोरणानुसार जिल्हास्तरावर देण्यात येणाऱ्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी सन २०२२-२३, २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या चार वर्षांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. युवक कल्याण व युवा विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थांनी विहित नमुन्यात २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्था यांची पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. युवक व युवतींना गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि १० हजार रुपये रोख, तर निवड झालेल्या संस्थेला गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक-युवतीचे वय १ एप्रिल रोजी किमान १३ वर्षे आणि ३१ मार्च रोजी कमाल ३५ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित अर्जदाराचे जिल्ह्यात सलग किमान पाच वर्षे वास्तव्य असणे बंधनकारक आहे.
अर्ज करणाऱ्या संस्थेची विधिवत नोंदणी झालेली असून ती किमान पाच वर्षांपासून कार्यरत असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. पुरस्कार मिळाल्यानंतरही संबंधित कार्य किमान दोन वर्षे सुरू ठेवण्याची अट आहे. पुरस्कार विभागून दिला जाणार नाही तसेच तो मरणोत्तर जाहीर केला जाणार नाही.
युवा विकासाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक कार्य, दुर्बल घटकांसाठी कार्य, अनुसूचित जाती-जमाती व आदिवासी भागातील कार्य, शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक व कला क्षेत्र, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा समावेश आहे.
तसेच नागरी व झोपडपट्टी सुधारणा, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक समस्या, शेतकरी आत्महत्या प्रतिबंध व संबंधित सामाजिक कार्य यासह युवा विकासाशी निगडित उल्लेखनीय कार्याचाही विचार केला जाणार आहे.
अर्जदारांना मुलाखतीसाठी तसेच आपल्या कार्याचे पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यासाठी आवश्यक साहित्य, सीडी आणि अन्य सबळ पुरावे पृष्ठांकन करून अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु