
अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.) : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावात जलापूर्ति योजनेसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार वर्षीय नायरा भूसुम या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, धारणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम चेंडो गावातही अशाच दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. गावातील जुन्या सोख खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून, या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, चेंडो गावातील सोख खड्डा खोल असून त्याभोवती सुरक्षा कठडे किंवा कुंपण करण्यात आलेले नाही. धोक्याची सूचना देणारे फलकही लावण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात येते. पावसासोबतच जलापूर्ति योजनेच्या पाइपलाइनमधून होणाऱ्या गळतीमुळे हा खड्डा पूर्णपणे पाण्याने भरला आहे. खड्ड्यात पाणी साचल्यामुळे त्याची प्रत्यक्ष खोली लक्षात येत नसल्याने धोका अधिकच वाढला आहे. गावातील लहान मुले खेळताना या परिसरात जात असल्याने एखादे मूल खड्ड्यात पडून गंभीर दुर्घटना घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कोरडा येथील दुर्घटनेनंतर संबंधित ग्रामसेवक, कंत्राटदार कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, या घटनेतून प्रशासनाने पुरेसा धडा घेतला नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मेळघाटातील विविध गावांमध्ये जलापूर्ति आणि अन्य योजनांसाठी खोदण्यात आलेले अनेक खड्डे अद्याप उघडे असून, त्यात पावसाचे पाणी साचले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा सर्व धोकादायक ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
चेंडो गावातील खड्डा तातडीने बुजवावा किंवा त्याभोवती मजबूत सुरक्षा कुंपण उभारून धोक्याचे इशारा फलक लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना टाळण्यासाठी आधीच खबरदारी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली असून, चेंडो गावातील संभाव्य धोका तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी