
शेअर बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांचे २.७७ लाख कोटी रुपये बुडाले
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट (हिं.स.)। माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची जोरदार विक्री, कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ आणि अमेरिका-इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची घटलेली शक्यता यामुळे भारतीय शेअर बाजारावर मंगळवारी दिवसभर दबाव राहिला. परिणामी सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला, तर निफ्टीने सलग सहाव्या दिवशी लाल निशाण्यात व्यवहाराचा शेवट केला. दिवसअखेर सेन्सेक्स ४९२.७० अंकांनी म्हणजेच ०.६३ टक्क्यांनी घसरून ७७,२३५.४६ अंकांवर बंद झाला. निफ्टीमध्ये १३२.७५ अंकांची म्हणजेच ०.५५ टक्क्यांची घसरण होऊन तो २४,१५४.९० अंकांवर स्थिरावला.
सेन्सेक्सने सकाळी ३०९.१९ अंकांच्या घसरणीसह ७७,४१८.९७ अंकांवर व्यवहार सुरू केला. सुरुवातीला खरेदीचा आधार मिळाल्याने निर्देशांक ७७,५७५.२१ अंकांपर्यंत पोहोचला. मात्र, त्यानंतर विक्रीचा दबाव वाढल्याने बाजाराची घसरण तीव्र झाली. निफ्टीदेखील ६३.८० अंकांनी घसरून २४,२२३.८५ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या खरेदीमुळे तो २४,२६९.६५ अंकांपर्यंत वधारला; मात्र त्यानंतर विक्री वाढल्याने निर्देशांक पुन्हा खाली आला.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. निफ्टी माहिती-तंत्रज्ञान निर्देशांक १.९३ टक्क्यांनी घसरला. ग्राहक टिकाऊ वस्तू, बँकिंग, भांडवली वस्तू, जलदगती ग्राहक वस्तू, धातू, तेल-वायू आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या समभागांमध्येही कमजोरी दिसून आली. दुसरीकडे वाहन, आरोग्यसेवा आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातील समभागांना खरेदीचा आधार मिळाला. मध्यम आणि लघु समभागांमध्येही विक्री कायम राहिली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ०.४३ टक्के, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.४० टक्क्यांनी घसरला. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.७७ लाख कोटी रुपयांची घट झाली. मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४९०.७८ लाख कोटी रुपयांवर आले. मागील सत्रात हे बाजारमूल्य ४९३.५५ लाख कोटी रुपये होते.
दिवसभरातील व्यवहारादरम्यान, बीएसईवर ४,५३० शेअर्समध्ये सक्रियपणे व्यवहार झाला. यापैकी १,९३० शेअर्स वाढीसह बंद झाले, २,३८४ शेअर्स घसरले आणि २१६ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. एनएसईवर ३,०५७ शेअर्समध्ये सक्रियपणे व्यवहार झाला. यापैकी १,३०७ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १,७५० शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्याचप्रमाणे, सेन्सेक्सवर सूचीबद्ध ३० शेअर्सपैकी ८ शेअर्स वाढीसह आणि २२ शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टीवर सूचीबद्ध ५० शेअर्सपैकी १० शेअर्स वाढीसह आणि ४० शेअर्स घसरणीसह बंद झाले.
मोठ्या कंपन्यांमध्ये एक्सिस बँक, मॅक्स हेल्थकेअर, महिंद्रा अँड महिंद्रा, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन हे प्रमुख तेजीचे समभाग ठरले. त्याउलट टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, एशियन पेंट्स, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजी या समभागांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule