अमरावतीच्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, एकाचा मृत्यू
अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूल येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना उलटी आणि जुलाबचा त्रास झाल्याने खळबळ उडाली. या आजारामुळं सात विद्यार्थी गंभीर आजारी असून, इयत्ता अकरावीचा विद्यार्थी राजेश बेठेकर याचा यात म
अमरावतीच्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थ्याचा मृत्यू


अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूल येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना उलटी आणि जुलाबचा त्रास झाल्याने खळबळ उडाली. या आजारामुळं सात विद्यार्थी गंभीर आजारी असून, इयत्ता अकरावीचा विद्यार्थी राजेश बेठेकर याचा यात मृत्यू झालाय.आज या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे

महर्षी पब्लिक स्कूल या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळं अनेकांना उलटी आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. 14 ऑगस्ट रोजी आजारी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानं शाळा प्रशासनानं या विद्यार्थ्यांना उपचार देण्याकरिता रुग्णालयात दाखल करण्याऐवजी थेट त्यांना घरी पाठवण्याची व्यवस्था केली. राजेश बेठेकर याला देखील त्याच्या चिखलदरा तालुक्यातील करंजखेडा या गावात पाठवण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर 16 ऑगस्टच्या पहाटे त्याचा मृत्यू झाला. मृत राजेश याचा चुलत भाऊ रामप्रसाद हा देखील गंभीर आजारी असून, त्याला उपचारासाठी चूरणी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

अमरावती शहरात असणाऱ्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये हे विद्यार्थी आजारी पडल्यावर त्यांना इतक्या लांब मेळघाटातील दुर्गम भागात पाठवून शाळेनं हात वर केल्यामुळं रोष व्यक्त केला जातोय. विद्यार्थ्यांना त्वरित रुग्णालयात न नेता आपली जबाबदारी झटकणाऱ्या महर्षी शाळा प्रशासनाविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत शाळा प्रशासनानं अधिक संवेदनशीलता आणि तत्परता दाखवणे आवश्यक असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासी निवासी शाळांची नियमित तपासणी करणे अपेक्षित आहे. या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande