यवतमाळ : जाजू कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी
यवतमाळ, १८ ऑगस्ट (हिं.स.) : प्रेक्षणीय टाकळी तलावाच्या परिसरात मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुण विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. तलावातील पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने जाजू कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांचा बुडून
पर्यटनासाठी गेलेल्या जाजू कॉलेजच्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला;


यवतमाळ, १८ ऑगस्ट (हिं.स.) : प्रेक्षणीय टाकळी तलावाच्या परिसरात मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुण विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. तलावातील पाण्याच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने जाजू कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे यवतमाळ शहरासह शैक्षणिक वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

मृत विद्यार्थ्यांची नावे पियूष यादव, प्रथमेश यादव आणि प्रसाद सातपुते (सर्व रा. यवतमाळ) अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जाजू कॉलेजमधील आठ मित्रांचा एक ग्रुप सोमवारी दुपारी फिरण्यासाठी टाकळी तलाव परिसरात गेला होता. निसर्गरम्य वातावरणात फिरल्यानंतर त्यांच्यातील पाच तरुण तलावाच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने अचानक दोन तरुणांच्या नाका-तोंडात पाणी गेले. त्यांनी प्रसंगावधान राखत पोहत बाहेर येऊन स्वतःचा जीव वाचवला.

मात्र, उर्वरित तिघे तरुण पाण्याच्या तीव्र ओढीत खोलवर ओढले गेले आणि बुडाले.

घटना घडताच तलाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. पाण्यातून बाहेर आलेल्या दोघांपैकी एका तरुणाची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक मच्छिमार तसेच आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीने तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. उशिरा तिघांचे मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तलावाकडे धाव घेतली. त्यामुळे परिसरात हृदयद्रावक वातावरण निर्माण झाले होते.

पर्यटनस्थळे ठरताहेत मृत्यूचे सापळे?

यवतमाळ परिसरातील पर्यटनस्थळी घडणाऱ्या दुर्घटनांनी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळजवळील बोरगाव धरण परिसरात सेल्फी आणि रील्स काढण्याच्या नादात दोन २१ वर्षीय तरुण विद्यार्थिनींना जीव गमवावा लागला होता.

ही घटना ताजी असतानाच टाकळी तलावात जाजू कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर धोकादायक पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था वाढविणे, धोक्याच्या ठिकाणी प्रवेशावर निर्बंध घालणे आणि पर्यटकांना स्पष्ट सूचना देणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande