मेळघाटमध्ये वाघांची संख्या वाढली; चार नवे शावक आढळले
हरिसाल-चौराकुंड परिसरात वाघिणीसह सहा ते सात वाघांचा वावर वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साह, ग्रामस्थांमध्ये चिंता अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल-चौराकुंड परिसरात वाघांची संख्या वाढत असल्याचे सकारात्मक संकेत मिळाले आहेत. ह
हरिसालमध्ये वाघिणीसह चार शावकांचे दर्शन; पर्यटकांमध्ये उत्साह, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा


हरिसाल-चौराकुंड परिसरात वाघिणीसह सहा ते सात वाघांचा वावर

वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साह, ग्रामस्थांमध्ये चिंता

अमरावती, 18 ऑगस्ट (हिं.स.) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल-चौराकुंड परिसरात वाघांची संख्या वाढत असल्याचे सकारात्मक संकेत मिळाले आहेत. हरिसाल वनपरिक्षेत्रात सुमारे चार ते पाच महिन्यांचे चार वाघाचे शावक आढळून आले असून, या परिसरात वाघिणीसह चार शावक आणि अन्य वाघ मिळून सुमारे सहा ते सात वाघांचा वावर असल्याचे सांगितले जात आहे.

मेळघाटच्या गगनमल आणि सिपना वन्यजीव अभयारण्य परिसरातही वाघांची संख्या वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब सकारात्मक मानली जात आहे.

दरम्यान, जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना वाघांसह अस्वल, बिबट्या, मोर, हरीण, सांबर आणि नीलगाय यांसारख्या विविध वन्यजीवांचे दर्शन होत आहे. त्यामुळे पर्यटक आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मात्र, वाघांचा वावर वाढल्याने हरिसाल परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतात काम करणाऱ्या नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे. जंगलालगतच्या भागात वन्यजीवांचा वावर वाढल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

“मेळघाटमध्ये वाघांची संख्या वाढणे ही आनंदाची आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली बातमी आहे. मात्र, वन्यजीव दिसून आल्यास नागरिकांनी तत्काळ स्थानिक वनविभागाशी किंवा १९२६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा,” असे हरिसाल वन्यजीव विभागाच्या वनक्षेत्र अधिकारी शुभांगी राऊत यांनी सांगितले.

वाघांच्या वाढत्या संख्येमुळे मेलघाटमधील जैवविविधता संवर्धनाला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी नागरिक आणि वनविभाग यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande