
सिनसिनाटी (अमेरिका), 19 ऑगस्ट (हिं.स.)ब्रँडन नकाशिमाने तीन 'मॅच पॉइंट्स' वाचवत सिनसिनाटी ओपनमधील आपली उत्कृष्ट कामगिरी कायम राखली आणि २३ एटीपी विजेतेपदे व माजी यूएस ओपन विजेतेपद पटकावणाऱ्या डॅनिल मेदवेदेवला धक्कादायक पराभव दिला.
नकाशिमाने रशियन टेनिसपटूचा ६-७(३), ७-६(४), ६-१ असा पराभव करून स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसऱ्या सेटमध्ये सर्व्हिस करताना ४-५ अशा स्थितीत ०-४० ने पिछाडीवर असताना, नकाशिमाची ही स्वप्नवत वाटचाल संपुष्टात येण्याच्या मार्गावर होती. मात्र, त्याने संयम राखला, उत्कृष्ट 'बॉल-स्ट्रायकिंग' आणि निर्भयतेचे प्रदर्शन केले. सिनसिनाटीचा माजी विजेता असलेल्या मेदवेदेवविरुद्ध सामन्याची सूत्रे आपल्या बाजूने फिरवत त्याने दोन तास ५१ मिनिटांत सामना जिंकला.
गेल्या आठवड्यात मॉन्ट्रियल येथे आपल्या कारकिर्दीतील पहिली एटीपी मास्टर्स १००० अंतिम फेरी गाठल्यानंतर आणि त्याआधी या महिन्याच्या सुरुवातीला वॉशिंग्टनमध्ये उपांत्य फेरी खेळल्यानंतर नकाशिमा या स्पर्धेत आला होता. या सलग दमदार कामगिरीमुळे तो एटीपी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम अशा २२ व्या स्थानावर पोहोचला आहे.
सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, मॅच पॉइंट्सच्या दडपणाखाली असताना, मी स्वतःला प्रत्येक गुणासाठी लढत राहण्यास सांगत होतो. जर त्याने तिथेच सामना जिंकला असता, तर त्याचे श्रेय त्यालाच गेले असते. मी फक्त लढत राहिलो आणि सामना तिसऱ्या सेटपर्यंत नेण्यात यशस्वी झालो. तिसऱ्या सेटमधील माझ्या खेळाच्या दर्जाबद्दल मी खूप आनंदी आहे. नकाशिमा पुढे म्हणाला, या सामन्यांदरम्यान चढ-उतार येतच असतात, काही वेळा मला तितकेसे चांगले वाटत नाही, पण मी प्रत्येक क्षणी टिकून राहण्याचा आणि लढत राहण्याचा प्रयत्न करतो.
नकाशिमाचा पुढील सामना नुनो बोर्जेसशी होईल. बोर्जेसनेही १३ व्या मानांकित टेनिसपटूविरुद्ध ६-३, ६-४ असा विजय मिळवत आंद्रे रुब्लेव्हविरुद्धची सलग पाच पराभवांची मालिका (हेड-टू-हेड) संपुष्टात आणली. तसेच, वॉशिंग्टनमध्ये 'एटीपी ५००' स्पर्धा जिंकल्यानंतर, टेलर फ्रिट्झने आपल्या मायदेशातील उत्कृष्ट कामगिरीची मालिका कायम राखत स्पेनचा उदयोन्मुख टेनिसपटू डॅनियल मेरिडाचा ६-३, ६-४ असा पराभव केला. आता 'राऊंड ऑफ १६' मध्ये त्याचा सामना ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस्तोफर ओ'कॉनेलशी होईल, ज्याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे