
वर्धा, 19 ऑगस्ट (हिं.स.) : वर्धा येथे
ग्रामसभा सुरू असतानाच दोन गट आमनेसामने आले आणि त्यांनी एकमेकांना धुधु धूतलं. या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या प्रकरणी दोन्ही गटाविरोधात हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वर्धामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्याच्या हिंगणघाट पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेदरम्यान राडा झाला. ग्रामसभेत एका नागरिकाने प्रश्न उपस्थित केल्यानंतर वादाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. पाहता पाहता या वादाचे रूपांतर दोन गटांतील हाणामारीत झाले. ग्रामसभा सुरू असतानाच सभागृहात दोन्ही गटांमध्ये जोरदार मारामारी झाली. ग्रामपंचायत सभागृहाबाहेरही ग्रामसभेला उपस्थित नागरिकांमध्ये राडा झाल्याचा व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गावातील रस्त्यावर सांडपाणी साचत असल्याने त्या ठिकाणी मुरूम टाकण्याची मागणी ग्रामसभेत करण्यात आली होती. याच मुद्द्यावरून वाद उफाळून आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामसभेसाठी गटविकास अधिकाऱ्यांनी नोडल अधिकारी म्हणून एका मुख्याध्यापकाची नियुक्ती केली होती. ग्रामसभेतील राड्यानंतर दोन्ही गट हिंगणघाट पोलिस ठाण्यात पोहोचले असून परस्पर तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. ग्रामसभेतील या हाणामारीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नांदगाव परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी