
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट (हिं.स.) : दिल्लीच्या मुंडका येथील टिकरी कलां परिसरात बुधवारी सीएनजी पंपावर ट्रकमध्ये गॅस भरताना सिलेंडरमध्ये भीषण स्फोट झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झालेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टिकरी कलां मेट्रो स्थानकाजवळील सीएनजी पंपावर सायंकाळी साडेतीनच्या सुमारास ट्रकमध्ये सीएनजी भरण्याचे काम सुरू होते. याचवेळी ट्रकच्या सिलिंडरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, परिसरात मोठा आवाज होऊन नागरिकांमध्ये घबराट पसरली. या अपघातात बाबा हरिदास कॉलोनी येथील मनीष नामक तरुणाचा मृत्यू झाला. तर सीएनजी पंपावर काम करणारे 5 कर्मचारी जखमी झालेत. त्यांना मुंडका येथील सीबी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या 2 गाड्या, एक वॉटर बाउझर तसेच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाला सायंकाळी चारच्या सुमारास ट्रकच्या सिलिंडरमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.प्राथमिक तपासानुसार, सीएनजी भरताना सिलिंडरमध्ये झालेल्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे. मात्र, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच सीएनजी पंपावर सुरक्षा नियमांचे योग्य प्रकारे पालन करण्यात आले होते का, याचीही चौकशी सुरू आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी