
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट (हिं.स.)भारतीय फुटबॉल चाहत्यांना येत्या काही महिन्यांत आणखी एक मोठा सामना पाहायला मिळू शकतो. भारत सप्टेंबर अखेर ते ऑक्टोबरच्या सुरुवातीस केप वर्दे संघाचे यजमानपद भूषवू शकतो. केप वर्दे संघाने २०२६ फिफा विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. हा प्रस्तावित सामना ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान खेळला जाण्याची शक्यता आहे. पण, सामन्याची तारीख आणि ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.
३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान भारत केप वर्देचे यजमानपद भूषवेल याची दाट शक्यता आहे. अधिकृत निर्णय झाल्यानंतर सामन्याचे ठिकाण आणि तारीख ठरवली जाईल. संबंधित प्रक्रिया आणि चर्चा सुरू आहेत. लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे.भारत आणि केप वर्दे यांच्यातील प्रस्तावित सामना ३ ऑक्टोबर रोजी कोलकाता येथे होणाऱ्या भारत-ब्राझील या हाय-प्रोफाईल मैत्रीपूर्ण सामन्याच्या आधी किंवा नंतर खेळला जाऊ शकतो. पण, या सामन्याचे अंतिम वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही.
फिफा क्रमवारीत ६४ व्या क्रमांकावर असलेल्या केप व्हर्डेने, २०२६ च्या विश्वचषकातील आपल्या पदार्पणातील प्रभावी कामगिरीने जागतिक लक्ष वेधून घेतले. गट फेरीमध्ये एकही सामना न हरता या संघाने बाद फेरी गाठली. गट फेरीत केप वर्देने अंतिम विजेत्या स्पेनला ०-० अशा बरोबरीत रोखले. त्यानंतर त्यांनी उरुग्वेविरुद्ध २-२ अशी रोमांचक बरोबरी साधली, तर सौदी अरेबियाविरुद्धचा त्यांचा सामनाही गोलशून्य बरोबरीत संपला. या निकालांमुळे बाद फेरीतील त्यांचे स्थान निश्चित झाले. मात्र, गतविजेत्या अर्जेंटिनाविरुद्धच्या अंतिम ३२ च्या सामन्यात त्यांची ही ऐतिहासिक मोहीम संपुष्टात आली. या सामन्यात केप वर्देने दोनदा पिछाडीवरून पुनरागमन केले, पण अतिरिक्त वेळेनंतर त्यांना २-३ ने पराभव पत्करावा लागला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे