
नवी दिल्ली , 19 ऑगस्ट (हिं.स.)।अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनने घुसखोरी केल्याच्या दाव्यांना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) फेटाळून लावले. ते म्हणाले, “चीन ६० किलोमीटर आत घुसला आहे, असे सांगणारे लोक आम्हाला बदनाम करण्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ शेअर करत आहेत. त्यांचे दावे चुकीचे आहेत.”
रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना मात्र सीमेवर समस्या असल्याचे मान्य केले. अरुणाचल प्रदेशातील काही गावांमधील नागरिकांनी सीमा प्रश्नाबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांची चिंता रास्त असल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप सीमांकन झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.रिजिजू म्हणाले, “याचा अर्थ चीनने भारतातील एखाद्या गावावर ताबा केला आहे, असा काढता कामा नये. सीमांकन झालेले नसल्यामुळे चीन काही भागांवर आपला दावा करतो. त्यामुळे चीनचे लोक आले आणि त्यांनी आमच्या गावावर कब्जा केला, असे नाही. सीमांकन झालेले नसल्यामुळे काही जमिनींवर ते आपला दावा करत आहेत.”
रिजिजू म्हणाले, “आमची जमीन पुढेपर्यंत आहे. चीनच्या बाजूला वसलेल्या गावांमधील लोक—त्यात तिबेटी आणि स्थानिक नागरिकांचाही समावेश आहे. त्यांची जमीन या भागात बरीच आतपर्यंत असल्याचा दावा करतात. त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण होते.” ते पुढे म्हणाले, “चीन ६० किलोमीटर आत घुसला आहे, असे खोटे दावे करणे किंवा बांगलादेश अथवा अन्य ठिकाणची या घटनेशी काहीही संबंध नसलेली छायाचित्रे पोस्ट करून चिनी सैन्य अरुणाचल प्रदेशात ६० किलोमीटर आत घुसल्याचा दावा करणे योग्य नाही. अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवल्यामुळे सीमेवर तैनात असलेल्या आपल्या जवानांचे आणि सुरक्षा दलांचे मनोबल खच्ची होते. देशातही संभ्रम निर्माण होतो. हे योग्य नाही.”
रिजिजू यांनी सांगितले की, भारताने सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) यांनी या भागातील गस्त वाढवली आहे.भारत सरकारने अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्यांना सर्वे ऑफ इंडियाच्या अधिकृत नकाशांवर प्रमाणित नावांनी ओळख देण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे.
अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांना चीनकडून वारंवार स्वतःची नावे देण्याचे प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने हा निर्णय घेतला आहे. भारताने वारंवार स्पष्ट केले आहे की, अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. परराष्ट्र मंत्रालयानेही भारत-चीन संबंध व्यापक पातळीवर सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) शांतता आणि स्थैर्य राखणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारताने स्पष्ट केले आहे की, सीमेवरील परिस्थितीचा परिणाम भारत आणि चीनमधील व्यापक द्विपक्षीय संबंधांवर होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ११ ऑगस्ट रोजी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा स्पष्ट केले होते की, “अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अखंड भाग आहे. हे स्वतःच स्पष्ट असलेले सत्य आहे. या निर्विवाद वास्तवात कोणतीही गोष्ट बदल घडवून आणू शकत नाही.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode