
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट (हिं.स.) : दिल्ली जल बोर्डाच्या (डीजेबी) सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या (एसटीपी) निविदा प्रक्रियेत कथित अनियमितता, तांत्रिक अटींमध्ये फेरफार आणि लाचखोरीच्या आरोपांप्रकरणी दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने (एसीबी) माजी जलमंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये दिल्ली जल बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि आयएएस अधिकारी उदित प्रकाश राय, माजी कंत्राटी सल्लागार अंकित श्रीवास्तव, एएन एंटरप्रायझेसचे मालक नागेंद्र यादव, युरोटेक एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मालक राजा कुमार कुर्रा आणि सृजनहारचे मालक पंकज वर्मा यांचा समावेश आहे. एसीबीच्या माहितीनुसार, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दाखल करण्यात आलेल्या एफआयआर क्रमांक 10/2024च्या तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. दिल्ली सरकारच्या दक्षता संचालनालयाने केलेल्या तक्रारीनंतर 11 मे 2024 रोजी हे प्रकरण दाखल करण्यात आले होते.
निविदा प्रक्रियेत फेरफार केल्याचा आरोप
तपासादरम्यान दिल्ली जल बोर्डाच्या एसटीपींचे आधुनिकीकरण आणि क्षमता वाढविण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट तांत्रिक अटी समाविष्ट करण्यात आल्याचे समोर आले. या अटींमुळे एका विशिष्ट तंत्रज्ञान पुरवठादार कंपनीला फायदा झाला आणि निविदेतील स्पर्धा मर्यादित करण्यात आल्याचा एसीबीचा आरोप आहे.एजन्सीच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित पायलट अभ्यास करण्यात आला नाही. तसेच वापरायच्या तंत्रज्ञान आणि माध्यमांबाबत प्रतिबंधात्मक अटी घालण्यात आल्या. प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या आवश्यक गुणवत्तेचे निकषही तांत्रिक अटींमध्ये समाविष्ट करण्यात आले नसल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.
एसीबीने केलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या विश्लेषणात काही खासगी व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये निविदेच्या अटी, शुद्धिपत्रे आणि इतर कागदपत्रांबाबत चर्चा झाल्याचे आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. या कागदपत्रांमध्ये करण्यात आलेले बदल नंतर एसटीपीच्या निविदेत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप आहे.
एकूण १.५२ कोटी रुपयांच्या व्यवहाराचा तपास
आर्थिक व्यवहारांच्या तपासादरम्यान लाच आणि कमिशनच्या कथित रकमेच्या हस्तांतरणाचे पुरावे मिळाल्याचे एसीबीने म्हटले आहे. एजन्सीच्या माहितीनुसार, युरोटेकशी संबंधित संस्थांकडून एएन एंटरप्रायझेसला रक्कम पाठविण्यात आली. त्यानंतर ही रक्कम काही सरकारी अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे.
तपासानुसार, तत्कालीन दिल्ली जल बोर्डाचे सीईओ उदित प्रकाश राय आणि त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 1.52 कोटी रुपये जमा झाल्याचा आरोप आहे. या रकमेचा वापर कथितपणे स्थावर मालमत्ता खरेदीसाठी करण्यात आल्याचे एसीबीने म्हटले आहे. एसीबीच्या म्हणण्यानुसार, सहाही आरोपींची चौकशी करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे त्यांना मंगळवारी कायद्यानुसार अटक करण्यात आली. कथित आर्थिक व्यवहारांचे संपूर्ण जाळे तसेच गुन्ह्यातून मिळालेल्या कथित रकमेचा तपास अद्याप सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असल्याचे भ्रष्टाचारविरोधी शाखेने स्पष्ट केले आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी