कोलकातातील फ्री स्कूल स्ट्रीटवरील हॉटेलला आग, 9 जणांचा मृत्यू
कोलकाता, १९ ऑगस्ट (हिं.स.) मंगळवारी रात्री उशिरा कोलकाताच्या फ्री स्कूल स्ट्रीट परिसरातील एका हॉटेलला लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला. आग इतक्या वेगाने पसरली की तिने जवळच्या अनेक हॉटेल्सना आपल्या कवेत घेतले. धुरामुळे गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडल
कोलकातातील फ्री स्कूल स्ट्रीटवरील हॉटेलला आग


कोलकाता, १९ ऑगस्ट (हिं.स.) मंगळवारी रात्री उशिरा कोलकाताच्या फ्री स्कूल स्ट्रीट परिसरातील एका हॉटेलला लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला. आग इतक्या वेगाने पसरली की तिने जवळच्या अनेक हॉटेल्सना आपल्या कवेत घेतले. धुरामुळे गुदमरून अनेक जण बेशुद्ध पडले आणि त्यांना घटनास्थळावरून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पहाटे २ वाजण्याच्या थोड्याच वेळ आधी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. खोल्यांमध्ये धूर भरला आणि तो आजूबाजूच्या परिसरात पसरला. हॉटेलमधील रहिवाशांमध्ये पळापळ झाली, जे बाहेर पडण्यासाठी धडपडत होते.अग्निशमन दलाला पहाटे २:०७ वाजता आगीबद्दल माहिती मिळाली. अनेक अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. न्यू मार्केट पोलीस स्टेशनचे पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकही घटनास्थळी पोहोचले. हॉटेल एका अरुंद गल्लीत असल्यामुळे अग्निशमन गाड्यांना आतपर्यंत नेणे शक्य नव्हते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरुवातीला बाहेरून आग विझवण्याचा प्रयत्न केला. नंतर, त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून मोठी बचाव मोहीम सुरू केली.

अग्निशमन दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी. पण, सविस्तर तपासानंतरच आगीचे नेमके कारण निश्चित होईल. तपासासाठी न्यायवैद्यक तज्ज्ञांचे एक पथकही घटनास्थळी दाखल होईल.या घटनेमुळे सोमवारी पहाटे बीरभूमच्या तारापीठ येथील हॉटेलला लागलेल्या आगीच्या घटनेची आठवण झाली. त्या घटनेत नऊ जण जळून खाक झाले होते. या घटनेनंतर हॉटेल मालक प्रबीर पाल आणि त्यांचा मुलगा कल्याण आशिष पाल यांना पोलिसांनी अटक केली होती.कोलकाता येथील या घटनेमुळे, सुमारे वर्षभरापूर्वी मध्य कोलकातातील मेचुआ फलापट्टी परिसरात लागलेल्या हॉटेल आगीच्या घटनेचीही आठवण झाली, ज्यात १४ जणांचा मृत्यू झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande