
तेहरान, 19 ऑगस्ट (हिं.स.)।इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध आता तणावपूर्ण कोंडीत अडकले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होर्मुझ जलमार्गावर वारंवार दावा करत आहेत, तर इराणचे म्हणणे आहे की ही सामुद्रधुनी इराणची होती आणि इराणचीच राहील. ताज्या घडामोडीत इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी मोहसेन रेजाई यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. त्यांनी म्हटले की, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यात अमेरिकेचे अपयश आणि त्यावर अधिकार सांगण्याचा अमेरिकेचा दावा यांच्यातील अंतर हे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आणि होर्मुझदरम्यानच्या ७,००० मैलांच्या अंतरापेक्षाही मोठे आहे.
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव रेजाई यांनी ‘एक्स’वर लिहिले, “अमेरिकेचे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यात आलेले अपयश आणि त्यावर अधिकार सांगण्याचा दावा यांच्यातील अंतर ७,००० मैलांपेक्षाही खूप मोठे आहे.”त्यांनी पुढे लिहिले, “पर्शियन आखातातील ‘पोस्ट-अमेरिकन ऑर्डर’ अर्थात अमेरिकेच्या वर्चस्वानंतरच्या नव्या पर्वात आपले स्वागत आहे.”
आपल्या पोस्टसोबत रेजाई यांनी जगाच्या नकाशाचा एक फोटो शेअर केला. त्याला त्यांनी “काही स्वप्ने वास्तवापासून खूप दूर असतात” असे कॅप्शन दिले. याद्वारे त्यांनी ट्रम्प यांच्या त्या निर्णयाची खिल्ली उडवली, ज्यामध्ये त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीला “अमेरिकेचा नवा भूभाग” असे संबोधले होते.
दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे माजी कमांडर असलेल्या रेजाई यांची या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी मोहम्मद बाघेरी झोलघद्र यांची जागा घेतली आहे.
मंगळवारी ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर एक नकाशा पोस्ट केला होता. त्यामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी “अमेरिकेचा नवा भूभाग” म्हणून दाखवण्यात आली होती. यासोबतच त्यांनी या महत्त्वाच्या सागरी मार्गावर ताबा मिळवण्याची अलीकडील धमकी पुन्हा एकदा दिली.
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील ऊर्जा पुरवठ्याचा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे पाचवा हिस्सा सामान्यतः या मार्गातून वाहतूक केला जातो. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने हा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे जहाज वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून, जगभरातील ऊर्जा पुरवठ्यावर संकट निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराण आणि अमेरिकेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने पुन्हा स्पष्ट केले आहे की, अमेरिका आपल्या अनेक मागण्या पूर्ण करेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाणार नाही.इराणच्या मागण्यांमध्ये इराणी बंदरांची नाकेबंदी समाप्त करणे, तेलावरील निर्बंध हटवणे, इराणची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करणे आणि युद्धातील नुकसानीची भरपाई देणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत अमेरिका आणि इराण यांच्यात करार व्हावा, अशी कतारची इच्छा आहे. अशा करारामुळे अमेरिका आणि इराणमधील चर्चा पुन्हा सुरू करण्याचा मार्ग सुकर होईल, असे कतारने म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode