कोलकाता हॉटेल अग्निकांडात मृत नऊ जणांमध्ये पाच बांगलादेशी नागरिक
कोलकाता, 19 ऑगस्ट (हिं.स.)। कोलकात्याच्या धर्मतला परिसरातील मिर्झा गालिब स्ट्रीट येथील हॉटेलमध्ये पहाटे लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांमध्ये पाच बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. कोलकाता येथील बांगलादेश उपउच्चायुक्त मोहम्म
Kolkata Hotel Fire Five Bangladeshi Nationals Among Nine Dead


कोलकाता, 19 ऑगस्ट (हिं.स.)। कोलकात्याच्या धर्मतला परिसरातील मिर्झा गालिब स्ट्रीट येथील हॉटेलमध्ये पहाटे लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांमध्ये पाच बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. कोलकाता येथील बांगलादेश उपउच्चायुक्त मोहम्मद खालिद यांनी याला दुजोरा दिला आहे. मात्र, कोलकाता पोलिसांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

रिपोर्टनुसार, मृत पाच बांगलादेशी नागरिकांपैकी चार जण कुष्टिया येथील, तर एक जण ढाका येथील सावर परिसरातील रहिवासी होता. मृतांची ओळख कुष्टिया येथील देवाशीष दत्त, शर्णशिष दत्त, अफसाना शिम्मिन, मोहम्मद अकरम अली आणि ढाका येथील सावरचा रहिवासी अहमद बाबू अशी झाली आहे. यापैकी शर्णशिषचे वय अवघे तीन वर्षे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, देवाशीष दत्त हे पत्नी अफसाना शिम्मिन आणि तीन वर्षांचा मुलगा शर्णशिष यांच्यासोबत बेंगळुरूला गेले होते. मुलाच्या उपचारानंतर तिघेही मंगळवारीच कोलकात्यात पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी धर्मतला येथील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील शिखा इन हॉटेलमध्ये खोली घेतली होती. त्याच रात्री हॉटेलमध्ये भीषण आग लागली, ज्यात तिघांचाही मृत्यू झाला.

बांगलादेश उपउच्चायोगातील एका अधिकाऱ्याने स्थानिक पोलीस ठाणे आणि शवागारात जाऊन मृतांची ओळख पटवली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाचही जणांची बांगलादेशी नागरिक म्हणून ओळख पटली. उपउच्चायुक्त मोहम्मद खालिद हे देखील घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

उल्लेखनीय म्हणजे, धर्मतला येथील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील शिखा इन हॉटेलमध्ये भीषण आग लागली होती. आग आणि धुरामुळे हॉटेलमध्ये अडकलेल्या नऊ जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता. घटनेनंतर हॉटेलमधील अग्निसुरक्षा व्यवस्था आणि इतर परवानग्यांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande