
इस्लामाबाद , 19 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानच्या लष्कराने डिस्कव्हरीच्या ‘डिक्लासिफाइड: ऑपरेशन सिंदूर’ या डॉक्युमेंटरी मालिकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या मालिकेत दाखवण्यात आलेल्या घटनाक्रमाचे चित्रण ‘अतिनाट्यमय, अतिशयोक्तीपूर्ण आणि एकतर्फी’ असल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) ने भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ला लष्करी यश म्हणून सादर करण्यात आल्यावर आक्षेप घेतला आहे. डॉक्युमेंटरी मालिकेत भारतातील वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेत्यांनी ऑपरेशन तसेच त्याच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर पाकिस्तानकडून ही प्रतिक्रिया आली आहे.
आयएसपीआर ने म्हटले की, ‘मार्का-ए-हक’ला एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही भारत कथितपणे ‘कटू सत्य’ स्वीकारण्यापासून दूर पळत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या म्हणण्यानुसार, भारताने कथित अपयश स्वीकारण्याऐवजी इतिहास आपल्या सोयीने मांडण्याचा मार्ग निवडला आहे. आयएसपीआर ने आरोप केला की, भारतीय कंटेंट क्रिएटर्सनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे ‘अतिनाट्यमय, अतिशयोक्तीपूर्ण आणि तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे’ चित्रण तयार केले असून, ते वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेतृत्वाच्या सहभागासह डॉक्युमेंटरी मालिकेच्या स्वरूपात सादर करण्यात आले आहे.निवडक मुलाखती, भावनिक निवेदन आणि बॉलिवूड शैलीतील दृश्यांच्या माध्यमातून ऑपरेशनच्या परिणामांचे एका विशिष्ट पद्धतीने चित्रण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
आयएसपीआरने डॉक्युमेंटरी मालिकेतील घटनाक्रमातील कथित विसंगतींचा उल्लेख करत म्हटले की, त्यामध्ये १६ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केलेले भाषण आणि २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, या संबंधाच्या समर्थनार्थ कोणताही ठोस आधार देण्यात आलेला नाही, असा पाकिस्तानचा आरोप आहे.पहलगाम हल्ल्यातील तीन कथित आरोपींची ओळख पटवून त्यांना २८ जुलै २०२५ रोजी ठार करण्यात आल्याचा भारताचा नंतरचा दावाही आयएसपीआरने उपस्थित केला. पाकिस्तानी लष्कराने प्रश्न उपस्थित केला की, जर कथित हल्ल्यासाठी जबाबदार व्यक्तींना २८ जुलै रोजी ठार करण्यात आले, तर ७ मे रोजी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताने कोणाला शिक्षा दिल्याचा दावा केला होता?
पाकिस्तानी लष्कराने डॉक्युमेंटरी मालिकेत ‘ऑपरेशन सिंदूर’ ‘१०० टक्के यशस्वी’ ठरल्याच्या दाव्यालाही आव्हान दिले.आयएसपीआरनुसार, ‘मार्का-ए-हक’दरम्यान पाकिस्तानने भारताची कारवाई हाणून पाडली आणि भारताची आठ लष्करी विमाने पाडल्याचा दावा केला. त्यानंतर पाकिस्तानने ‘ऑपरेशन बनयान-उल-मरसूस’ सुरू केले. या कारवाईत फतह प्रिसिजन-गाइडेड रॉकेट आणि क्षेपणास्त्रे, पाकिस्तानी हवाई दलाची अचूक शस्त्रे, लांब पल्ल्याची लोइटरिंग म्युनिशन्स आणि अचूक तोफगोळ्यांचा वापर करून २६ लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा पाकिस्तानने केला.पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी वापरली जात असल्याचा दावा करण्यात आलेली ठिकाणे तसेच पाकिस्तानविरोधी दहशतवादाला कथितपणे प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांचाही समावेश होता.
आयएसपीआर ने म्हटले की, डॉक्युमेंटरी मालिकेत भारताच्या स्वतःच्या लष्करी नेतृत्वाकडून पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि हवाई कारवाया करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच नियंत्रण रेषेवर (LoC) सातत्याने संघर्ष सुरू राहिल्याचे आणि भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय झाल्याचेही मालिकेत मान्य करण्यात आले आहे. या बाबी भारताने केलेल्या त्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, ज्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानचा एकतर्फी आणि निर्णायक पराभव केल्याचे सांगण्यात आले आहे, असा पाकिस्तानचा दावा आहे.
लढाई ज्या पद्धतीने थांबली, त्याचाही पाकिस्तानने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ उल्लेख केला आहे. आयएसपीआर नुसार, डॉक्युमेंटरी मालिकेतच दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांमध्ये (DGMOs) झालेल्या चर्चेनंतर आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत सहमती झाल्यानंतर संघर्ष संपल्याचे सांगण्यात आले आहे.यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ला भारताचा एकतर्फी लष्करी विजय म्हणून सादर करण्याचा प्रयत्न कमकुवत होतो, असा पाकिस्तानचा दावा आहे. अमेरिकेच्या भूमिकेचाही आयएसपीआर ने उल्लेख केला. बाह्य मदतीमुळे संघर्ष थांबला असेल, तर त्याला बिनशर्त लष्करी विजयाचा पुरावा मानता येणार नाही, असे पाकिस्तानने म्हटले आहे.आयएसपीआर ने म्हटले की, डॉक्युमेंटरी मालिकेत एका बाजूला अचानक हल्ले, अचूक लक्ष्यभेद, खोलवर हल्ले आणि लष्करी आघाडी कायम ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. तर दुसरीकडे भारताने जाणीवपूर्वक संघर्ष मर्यादित ठेवला आणि पाकिस्तानला ‘माघार घेण्याचा मार्ग’ दिला, असाही दावा करण्यात आला आहे.पाकिस्तानच्या मते, हे परस्परविरोधी दावे दाखवतात की ही डॉक्युमेंटरी निष्पक्ष लष्करी विश्लेषणाऐवजी देशांतर्गत प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आलेली एक विशिष्ट कथा आहे.
आयएसपीआर ने भारतावर ‘प्रचारयंत्रणेच्या माध्यमातून लष्करी चूक यशस्वी कारवाई म्हणून सादर केल्याचा’ आरोप केला.जबाबात म्हटले आहे की, सिनेमॅटिक पद्धतीने घटनांचे पुनर्चित्रण केल्याने ना घटनांचा क्रम बदलता येतो, ना विमानांचे नुकसान किंवा सैनिकांच्या मृत्यूची वास्तविकता लपवता येते आणि ना वास्तविक लष्करी संघर्षाचे स्वरूप बदलता येते. पाकिस्तानने दावा केला की, ‘मार्का-ए-हक’शी संबंधित लष्करी नोंदी, युद्धभूमीवरील पुरावे, राजनैतिक चर्चा आणि त्यानंतर भारताकडून करण्यात आलेली वक्तव्ये या घटनाक्रमाचे खरे चित्र स्पष्ट करतात.
पाकिस्तानी लष्कराने म्हटले की, पाकिस्तान प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र, देशाचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी त्याचे लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. आयएसपीआर ने इशारा दिला की, भविष्यात कोणत्याही लष्करी धाडसाला ‘कठोर, निर्णायक आणि अत्यंत जोरदार प्रत्युत्तर’ दिले जाईल. पाकिस्तानने म्हटले की, त्यानंतर कोणतीही ‘सिनेमॅटिक कथा’ भारताची कथित परिस्थिती वाचवू शकणार नाही.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करत ७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. चार दिवस चाललेला लष्करी संघर्ष १० मे रोजी दोन्ही देशांमध्ये झालेल्या सहमतीनंतर थांबला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode