
अमरावती, 19 ऑगस्ट (हिं.स.)हातात प्राणघातक शस्त्र घेऊन त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या २० वर्षीय युवकाला राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. वेदांत विनोदराव वर्गे (रा. शिव मंदिराजवळ, आदर्श नगर, गोपालनगर, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. राजापेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना सोशल मीडियावर एका युवकाचा शस्त्र हातात घेतलेला फोटो व्हायरल होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी राजापेठ डी.बी. पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पथकाचे प्रमुख सपोनि नितीन शिंदे व कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, गोपालनगर येथील सुतगिरणीसमोर एक युवक प्राणघातक शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेदांत वर्गे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १२.५० इंच लांबीचा, ९ इंच पाते असलेला चायना चाकू, अंदाजे १,२०० रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५७/२०२६ अन्वये कलम ४/२५ आर्म्स ॲक्टसह कलम १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी