चौथ्या भारत-सिंगापूर व्यापार गोलमेज परिषदेसाठी मंत्री पीयूष गोयल सिंगापूरला रवाना
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 19-21 ऑगस्ट 2026 या दरम्यान सिंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेच्या चौकटींतर्गत सुरू असलेल्या उच्च-स्तरीय संवादाचा एक भाग
Union Commerce and Industry Minister Piyush Goyal


नवी दिल्ली, 19 ऑगस्ट (हिं.स.)। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 19-21 ऑगस्ट 2026 या दरम्यान सिंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेच्या चौकटींतर्गत सुरू असलेल्या उच्च-स्तरीय संवादाचा एक भाग आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल 20 ऑगस्ट 2026 रोजी चौथ्या भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेत (आयएसएमआर) सहभागी होतील. या दौऱ्यात पीयूष गोयल, सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट घेतील.भारत-सिंगापूर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी, अधिक बळकट करण्यासाठी सर्वोच्च मंत्रीस्तरीय यंत्रणा म्हणून आयएसएमआर भूमिका बजावते. ही गोलमेज परिषद चौथ्या भारत-सिंगापूर व्यावसायिक गोलमेज परिषदेसोबत (आयएसबीआर) आयोजित केली जाईल. त्यानंतर सामंजस्य करारावर स्वाक्षरी होईल. सिंगापूरच्या उप-पंतप्रधानांनी आयएसएमआर व आयएसबीआरच्या सर्व प्रतिनिधींसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही केले आहे.केंद्रीय मंत्री गोयल यांच्यासमवेत या गोलमेज परिषदेत वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवदेखील सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात ते आपल्या समकक्ष मंत्र्यांशी आणि वरिष्ठ सिंगापूर नेतृत्वाशी चर्चा करतील.

पीयूष गोयल यांच्यासोबत, भारत आणि सिंगापूर यांच्यातील आर्थिक व व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी विविध क्षेत्रांतील सुमारे 70 वरिष्ठ व्यवसाय अग्रणींचे भारतीय प्रतिनिधीमंडळही सिंगापूरच्या दौऱ्यावर आहे. यात तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, वस्तुनिर्माण आणि अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा आणि शाश्वतता, वित्तीय सेवा आणि फिनटेक, आरोग्यसेवा आणि जीवन-विज्ञान, अन्न आणि कृषी, लॉजिस्टिक्स, सागरी क्षेत्र व व्यापार, तसेच व्यावसायिक सेवा या क्षेत्रांतील प्रतिनिधींचा समावेश आहे.

हे प्रतिनिधीमंडळ B2B, G2B बैठकांसह सिंगापूरमधल्या कौशल्य संस्था आणि उत्कृष्टता केंद्रांना भेटी देऊन संस्थात्मक स्तरावरील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होईल. या भेटी भागीदारी, गुंतवणूक, बाजारपेठेतील प्रवेश, तंत्रज्ञानविषयक सहयोग आणि प्रतिभा विकास यांवर केंद्रित असतील. भारत-सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषद आणि भारत-सिंगापूर व्यावसायिक गोलमेज परिषद यांदरम्यान त्यांचे आयोजन केले जात आहे.

या दौऱ्यात केंद्रीय मंत्री गोयल ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क, वायपीओ ग्लोबल, मिल्केन इन्स्टिट्यूट, केपेल इन्फ्रास्ट्रक्चर, टेमासेक होल्डिंग्ज आणि आयएचएच हेल्थकेअर यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींसह सिंगापूर बिझनेस फेडरेशनच्या अध्यक्षांच्या नेतृत्वातील प्रतिनिधीमंडळ, टर्नर अँड टाउनसेंड आणि एसटीटी जीडीसी यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत G2B बैठका घेतील. या बैठकांनंतर फॅमिली ऑफिस राउंडटेबलचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री गोयल सिंगापूरच्या परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार व उद्योग राज्यमंत्री, गान सिओ हुआंग यांच्यासोबत सिटी स्क्वेअर मॉल येथील अपेडा-फेअरप्राइस उपक्रमाला संयुक्तपणे भेट देतील. या उपक्रमाचा उद्देश भारतीय कृषी-खाद्य निर्यातीला प्रोत्साहन देणे आणि सिंगापूरच्या किरकोळ बाजारात त्यांचे स्थान मजबूत करणे हा आहे. यातून दोन्ही देशांमधील वाढते कृषी-व्यापार संबंध प्रतिबिंबित होतात.

पीयूष गोयल 'इन्सीड' (INSEAD) आशिया कॅम्पस येथे फिक्कीद्वारे आयोजित 'भारत-सिंगापूर व्यापार मंच'मध्ये सहभागी होतील. या कार्यक्रमात ते 'नवीन जागतिक विकास समीकरणातील भारत: आशिया आणि जगातील व्यवसायांसाठी विकास आणि संधी' या विषयावरील अनौपचारिक संवादात भाग घेतील. त्यानंतर ते भारत आणि सिंगापूरमधील व्यावसायिक समुदायासोबतच्या स्नेहभोजनास उपस्थित राहतील. मरिना बे सँड्स एक्स्पो अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणाऱ्या 'आयसीएआय आसियान परिषद 2026' मध्ये गोयल यांचे बीजभाषण होईल आणि त्यानंतर त्यांच्या या दौऱ्याची सांगता होईल.

सिंगापूर हा भारताचा एक प्रमुख आर्थिक भागीदार आणि गुंतवणुकीचा मोठा स्रोत असलेला देश आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 19.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या परकीय थेट गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारतासाठी एफडीआय अर्थात परकीय थेट गुंतवणुकीच्या ओघाचा सर्वात मोठा स्रोत ठरला. एप्रिल 2000 ते मार्च 2026 या कालावधीत सिंगापूरकडून आलेली एकूण परकीय थेट गुंतवणूक 194.68 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असून भारतातील एकूण परकीय थेट गुंतवणुकीपैकी ती 24.72% आहे.

सिंगापूर हा आसियानमधील भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून, बाह्य व्यावसायिक कर्जे आणि परकीय पोर्टफोलिओ गुंतवणुकीचा तो एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे. भारत-सिंगापूर सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारानंतर द्विपक्षीय व्यापारात लक्षणीय वाढ झाली असून, तो आर्थिक वर्ष 2004-05 मधील 6.7 अब्ज अमेरिकी डॉलरवरून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 36.1 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

हा दौरा सिंगापूरसोबतचे व्यापार, गुंतवणूक आणि परस्पर नागरिक संबंध दृढ करण्याची भारताची वचनबद्धता दर्शवतो. सिंगापूर हा भारतासाठी परकीय थेट गुंतवणुकीचा एक प्रमुख स्रोत तर आहेच, शिवाय प्रगत वस्तुनिर्माण, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास आणि हरित अर्थव्यवस्था या क्षेत्रांमधील एक महत्त्वाचा भागीदारही आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande