विशाखापट्टणममध्ये संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला प्रारंभ
लोकसंख्या असंतुलनावर बैठकीत होणार मंथन संघ परिवारातील ३२ संघटनांचे पदाधिकारी सहभागी नागपूर, 19 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि संघ परिवारातील विविध संघटनांच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला बुधवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम
आरएसएस-लोगो


लोकसंख्या असंतुलनावर बैठकीत होणार मंथन संघ परिवारातील ३२ संघटनांचे पदाधिकारी सहभागी

नागपूर, 19 ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि संघ परिवारातील विविध संघटनांच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला बुधवारी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील गुडीलोवा येथे प्रारंभ झाला. आगामी 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत यंदा लोकसंख्या असंतुलनाचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. जनगणना, देशातील लोकसंख्येतील बदल आणि त्याचे सामाजिक परिणाम यावरही बैठकीत सविस्तर विचारमंथन होण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर अखिल भारतीय समन्वय बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत संघप्रेरित विविध संघटनांच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेतला जातो. तसेच आगामी काळातील उपक्रम, योजना आणि सामाजिक विषयांवरील समन्वयाबाबत चर्चा केली जाते.यंदाच्या बैठकीत देशातील विविध राज्यांमधील लोकसंख्येच्या रचनेतील बदल, त्यामागील कारणे, त्याचे सामाजिक परिणाम तसेच दीर्घकालीन राष्ट्रीय धोरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विविध संघटना आपल्या कार्यक्षेत्रातील अनुभव आणि निरीक्षणे बैठकीत मांडणार आहेत.

लोकसंख्या असंतुलनाबरोबरच नशामुक्ती, युवकांमध्ये जागृती, पंच परिवर्तन आणि विकासाची भारतीय संकल्पना यांसारखे विषयही चर्चेच्या अजेंड्यावर असल्याचे समजते. सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाशी संबंधित विविध प्रश्नांवर विचारविनिमय तसेच संघ परिवारातील संघटनांमध्ये अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याचे व्यासपीठ म्हणून या बैठकीकडे पाहिले जाते.या बैठकीला संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सहसरकार्यवाह तसेच अखिल भारतीय कार्यविभागांचे प्रमुख उपस्थित आहेत. याशिवाय भारतीय जनता पक्ष, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सक्षम आणि राष्ट्र सेविका समितीसह संघ परिवारातील ३२ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

बैठकीदरम्यान प्रत्येक संघटना आपल्या वर्षभरातील कार्याचा आढावा सादर करणार आहे. सामाजिक प्रश्नांवर परस्पर समन्वय वाढविणे, जनकल्याणाशी संबंधित उपक्रम अधिक प्रभावी करणे तसेच धोरणात्मक विषयांवरील संवाद मजबूत करण्याबाबतही चर्चा होणार आहे.दरम्यान, लोकसंख्या असंतुलनाचा मुद्दा संघाच्या व्यापक सामाजिक अजेंड्यावर कोणत्या स्वरूपात मांडला जातो आणि त्यासंदर्भात कोणती भूमिका पुढे येते, याकडे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande