
बीड, 19 ऑगस्ट (हिं.स.)। गावातील तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयात आणि शाळेच्या पटांगणात बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याने झालेल्या तीव्र मनस्ताप व अपमानातून एका २६ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना धानोरा बुद्रुक येथे घडली. या प्रकरणी मयत तरुणाच्या भावाच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी रमेश दहिभाते (रा. धानोरा बुद्रुक, ता. अंबाजोगाई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा लहान भाऊ किरण रमेश दहिभाते (वय २६) हा ग्रामपंचायत कार्यालयात पाणी पुरवठा विभागात काम करत होता. गावातील अमोल व्यंकटी पांडे, काकासाहेब व्यंकटी पांडे, बप्पासाहेब व्यंकटी पांडे आणि श्रीकांत संपत गोरे (सर्व रा. धानोरा बुद्रुक) यांनी किरण यास ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन मुलींची छेड काढल्याचा खोटा संशय घेत लाथाबुक्क्यांनी व बेल्टने बेदम मारहाण केली. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात नेऊन दगडाने मारहाण करत किरण व त्याचा भाऊ रवी यांना जातीवाचक शिवीगाळ केली. या मारहाणीमुळे आणि झालेल्या अपमानामुळे किरण प्रचंड मानसिक तणावात होता. या विवंचनेतून त्याने स्वतःच्या राहत्या घरी लोखंडी आडूच्या साहाय्याने दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.या प्रकरणी वरील चारही आरोपींविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे (आयपीएस) करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis