
अबू धाबी , 19 ऑगस्ट (हिं.स.)। मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने (युएई) इराणसोबतचे सर्व प्रकारचे व्यापारी आणि आर्थिक व्यवहार तातडीने निलंबित करण्याची घोषणा केली आहे.
युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संचार संचालिका अफरा अल हामेली यांनी सांगितले की, या प्रदेशातील वाढता तणाव लक्षात घेता हा कठोर निर्णय घेण्यात आला असून, पुढील सूचना मिळेपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.
युएईने इराणवर आपल्या सागरी हद्दीच्या आत आणि बाहेर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप केल्यानंतर हा कठोर निर्णय घेण्यात आला.
युएईच्या संरक्षण मंत्रालयानुसार, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणकडून येणाऱ्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेतला. ही क्षेपणास्त्रे समुद्रातील जहाजांना लक्ष्य करत होती आणि नंतर समुद्रात कोसळली.
या घटनेदरम्यान स्थानिक नागरिकांना संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा देण्यासाठी आपत्कालीन फोन अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, काही वेळानंतर हा अलर्ट मागे घेण्यात आला.दुसरीकडे, इराणने हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. तेहरानमध्ये इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितले की, युएईचे दावे पूर्णपणे निराधार आहेत.अशा प्रकारच्या आरोपांमुळे प्रादेशिक सुरक्षा प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना धक्का पोहोचतो, असेही त्यांनी म्हटले.मात्र, इराणने असा इशारा दिला आहे की, अमेरिकेसोबत शांतता करार होईपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहील.
दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी मध्य पूर्वेत युद्ध सुरू झाल्यापासून युएईला इराणकडून झालेल्या सर्वात भीषण हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. या कालावधीत युएईवर सुमारे ३,००० क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आल्याचे सांगितले जाते.अलीकडच्या काही आठवड्यांत ॲडनॉकच्या तेलवाहू जहाजांवरही सातत्याने हल्ले झाले आहेत. जूनमध्ये झालेला द्विपक्षीय करार मोडल्यानंतर युएई आणि इराणमधील संबंध पुन्हा एकदा अत्यंत नाजूक वळणावर पोहोचले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode