हॉकी विश्वचषक 2026 : हाय-व्होल्टेज मुकाबल्यात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५-३ ने विजय
ॲमस्टेलवीन (नेदरलँड्स), 19 ऑगस्ट (हिं.स.) - २०२६ च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ५-३ ने पराभूत करून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ॲमस्टेलवीन येथील वॅग्नर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पूल डी च्या या सामन्यात भारती
भारतीय हॉकी संघ


भारतीय हॉकी संघ


ॲमस्टेलवीन (नेदरलँड्स), 19 ऑगस्ट (हिं.स.) - २०२६ च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ५-३ ने पराभूत करून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ॲमस्टेलवीन येथील वॅग्नर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पूल डी च्या या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला. कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांच्या प्रत्येकी दोन गोलांमुळे भारताने सामन्यावरील आपली पकड अधिक घट्ट केली, तर हार्दिक सिंगनेही एक गोल केला. पाकिस्तानकडून हन्नान शाहिदने दोन आणि सुफियान खानने एक गोल केला.

भारताचा पाकिस्तानवर वरचष्मा

भारताने गेल्या १० वर्षांपासून पाकिस्तानवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. नेदरलँड्समध्ये खेळल्या गेलेल्या हॉकी विश्वचषकाच्या हहॉसामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला. २०१६ पासून पाकिस्तानने भारताविरुद्ध एकही सामना जिंकला नव्हता. भारताने पहिल्या क्वार्टरपासूनच आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यावर आघाडी घेतली.

भारताची आक्रमक सुरुवात

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू होताच भारतीय संघाने आक्रमक पवित्रा घेतला. चौथ्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि अवघ्या एका मिनिटानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने एक शानदार गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. नवव्या मिनिटाला पाकिस्तानच्या मोहम्मद हम्मादुद्दीनला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. भारतीय संघाने याचा फायदा घेतला आणि १० व्या मिनिटाला अभिषेकने एक शानदार गोल करून भारताची आघाडी २-० अशी वाढवली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने पाकिस्तानला कोणतीही संधी दिली नाही आणि २-० च्या आघाडीसह पहिला क्वार्टर संपवला.

दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचे वर्चस्व

दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. १९व्या मिनिटाला भारताला पेनल्टी मिळाली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने २०व्या मिनिटाला या संधीचे गोलमध्ये रूपांतर करून भारताची आघाडी ३-० अशी वाढवली. मात्र, त्यानंतर पाकिस्तानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. २१व्या मिनिटाला हन्नान शाहिदने पाकिस्तानसाठी पहिला गोल करून स्कोअर ३-१ असा केला. भारताने जास्त वेळ वाट पाहिली नाही. २३व्या मिनिटाला अभिषेकने आपला दुसरा गोल करून भारताला ४-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. त्याच मिनिटाला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि २४व्या मिनिटाला सुफियान खानने त्याचे गोलमध्ये रूपांतर करून स्कोअर ४-२ असा केला. मध्यंतरापर्यंत भारत ४-२ ने आघाडीवर होता.

तिसऱ्या क्वार्टरमध्येही आघाडी कायम

भारताने तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला आपली आघाडी कायम ठेवली. २९ व्या मिनिटाला भारताच्या सुखजीत सिंगला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. त्यानंतर ३४ व्या मिनिटाला हार्दिक सिंगने एक शानदार गोल करून भारताची आघाडी ५-२ अशी वाढवली. ३६ व्या मिनिटाला पाकिस्तानच्या झिक्रिया हयातलाही ग्रीन कार्ड दाखवण्यात आले, तर ३८ व्या मिनिटाला भारताच्या राजिंदर सिंगलाही ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. भारताने तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत ५-२ अशी आघाडी कायम ठेवली.

पाकिस्तानचा पुनरागमनचाा प्रयत्न

सामन्याच्या शेवटच्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानने पुनरागमन करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. ४५ व्या मिनिटाला हन्नान शाहिदने आपला दुसरा गोल करून पाकिस्तानला सामन्यात परत आणले. यामुळे स्कोअर भारताच्या बाजूने ५-३ असा झाला. त्यानंतर पाकिस्तानने दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय बचाव भक्कम राहिला. भारताने शेवटपर्यंत आपली ५-३ अशी आघाडी कायम ठेवली.

रोमहर्षक लढतीत भारत अजिंंक्य

भारताने पाकिस्तानला ५-३ ने पराभूत करून अखेर २०२६ हॉकी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. या विजयासह भारतीय संघाने पाकिस्तानचा विश्वचषकातील प्रवासही संपुष्टात आणला. भारताकडून हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर हार्दिक सिंगने एका गोलची भर घातली. पाकिस्तानकडून हन्नान शाहिदने दोन आणि सुफियान खानने एक गोल केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande