
पुणे, 19 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात १० वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जुन्नरमधील पिंपळवाडी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत चिमुकलीला शेतात नेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
अवघ्या १० वर्षांच्या मुलीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या गावातच ही घटना घडल्याने परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु