
काबुल , 02 ऑगस्ट (हिं.स.)।अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी पूर्वेकडील नंगरहार प्रांतात शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला असून विविध प्रकारच्या २४ असॉल्ट रायफल्स जप्त केल्या आहेत. प्रांतीय प्रशासनाने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही शस्त्रे शेजारील देशातून गुप्तपणे अफगाणिस्तानात आणली जात होती. सुरक्षा दलांनी तोरखम सीमारेषा तपासणी केंद्रावर ही कारवाई केली.
वृत्तसंस्थेने सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ही शस्त्रे एका वाहनामध्ये लपवून ठेवण्यात आली होती. या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आली आहे की नाही, याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
ही कारवाई अफगाण सरकारच्या व्यापक मोहिमेचा भाग असून, त्याअंतर्गत सुरक्षा यंत्रणा सर्वसामान्य नागरिकांकडे असलेल्या बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सीमावर्ती भागांमधून होणारी शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
अफगाण सीमावर्ती भागात अशा प्रकारची शस्त्रजप्ती होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी २९ जुलै रोजी, अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील लगमान प्रांतात पोलिसांनी बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्याच्या आरोपाखाली दोन जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला होता.
प्रांतीय पोलिसांचे प्रवक्ते मोहम्मद युनूस युसुफझई यांनी या कारवाईची माहिती देताना सांगितले होते की, दौलत शाह जिल्ह्यात दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून पाच कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफल्स, तीन हँड ग्रेनेड तसेच शेकडो काडतुसे आणि इतर दारुगोळा जप्त करण्यात आला.
युसुफझई यांनी स्पष्ट केले होते की, कोणालाही कायदा हातात घेण्याची किंवा परवानगीशिवाय शस्त्रे बाळगण्याची अथवा वाहून नेण्याची मुभा दिली जाणार नाही. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याचा धोका निर्माण होतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode