
मॉस्को, 02 ऑगस्ट (हिं.स.)।रशियाची राजधानी मॉस्कोच्या मध्यवर्ती भागातील एका रेस्टॉरंटमध्ये शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटात किमान तीन जणांचा मृत्यू झाला. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये स्फोट घडवून आणणाऱ्या महिलेचाही समावेश आहे.
रशियाची सरकारी वृत्तसंस्थाच्या वृत्तानुसार, मॉस्कोतील कुद्रिन्स्काया स्क्वेअर येथे असलेल्या रेस्टॉरंटमध्ये झालेल्या या स्फोटात किमान 21 जण जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात महिलेने कथितरित्या स्फोटक उपकरण रेस्टॉरंटमध्ये नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने तिला आत जाण्यापासून रोखले. त्याचवेळी स्फोट झाला.या भीषण स्फोटात संबंधित महिला, सुरक्षा रक्षक आणि रेस्टॉरंटमधील एका ग्राहकाचा मृत्यू झाला.
रशियन वृत्तसंस्थेनुसार, मॉस्को तपास समितीने या स्फोटामागील कारणे आणि घटनेशी संबंधित सर्व बाबींचा सखोल तपास सुरू केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिक माहिती गोळा केली जात आहे. वृत्तानुसार, मॉस्कोतील स्टालिनकालीन प्रसिद्ध गगनचुंबी इमारतींपैकी एका इमारतीत हे रेस्टॉरंट असून, तेथे एका खासगी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी अद्याप पाहुण्यांची यादी जाहीर केलेली नाही, तसेच हल्ल्याचे नेमके लक्ष्य कोण होते, याबाबतही कोणतीही माहिती दिलेली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोटानंतर अनेक जखमींना रक्ताने माखलेल्या अवस्थेत बाहेर आणले जात होते. सुरुवातीच्या अहवालांमध्ये स्फोट रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात झाल्याचे म्हटले गेले होते. मात्र, नंतर रेस्टॉरंट प्रशासनाने निवेदन जारी करत, “समस्या बाहेरील भागात निर्माण झाली होती,” असे स्पष्ट केले.
प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसज्ज कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे अधिकारी तैनात असल्याचे दिसून येते. स्फोटानंतर परिसर सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत मॉस्को आणि आसपासच्या भागात अनेक वरिष्ठ रशियन लष्करी अधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या आहेत. या हल्ल्यांसाठी मॉस्कोने युक्रेनची राजधानी कीव यांना जबाबदार धरले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode