
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट (हिं.स.)। काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनी अयोध्येतील राम मंदिर बांधकामाबाबत भाजप आणि ट्रस्टवर आरोप करत दावा केला की, मंदिर बांधकामादरम्यान शेकडो कोटी रुपयांची चोरी झाली, सोने-चांदी वितळवून विकण्यात आले आणि तो पैसा शेअर बाजारात गुंतवण्यात आला. त्यांनी याला कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेवरचा दरोडा असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली.
प्रमोद तिवारी यांनी रविवारी येथे काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, मंदिरात केवळ देणगीची चोरी झाली नाही, तर शिला पूजनाच्या काळापासूनच गैरव्यवहार सुरू झाले होते. भाजपने मंदिर बांधकामाचा नेहमीच निवडणुकीचा मुद्दा बनवला आणि प्रत्यक्ष बांधकाम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच शक्य झाले.
ते म्हणाले की, प्राणप्रतिष्ठा अपूर्ण मंदिरात करण्यात आली आणि शंकराचार्यांना निमंत्रित करण्यात आले नाही, जरी पूजा त्यांच्याकडूनच करून घेतली जाणे अपेक्षित होते. त्यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीवर ११२ कोटी रुपये खर्च करण्यात आले, ज्यामध्ये फुले आणि खुर्च्यांच्या खरेदीसाठी अनेक पटीने जास्त किंमत मोजण्यात आली.
त्यांनी आरोप केला की, अयोध्येतील राम मंदिर बांधकामादरम्यान सात मोठे जमिनीचे व्यवहार झाले, ज्यामध्ये सर्कल रेटपेक्षा १७ पट अधिक रक्कम अदा करण्यात आली. एका व्यवहारात २ कोटी रुपयांची जमीन खरेदी करून केवळ १० मिनिटांनंतर ती १८ कोटी रुपयांना विकण्यात आली. मंदिरातील ‘चढावा चोरी’ प्रकरणात पंतप्रधानही जबाबदारीपासून दूर राहू शकत नाहीत.
ते म्हणाले की, भाजप ‘देणगी चोरी’ प्रकरण लोक विसरावेत, यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र त्यांना याचे उत्तर द्यावेच लागेल. आमची मागणी आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, जेणेकरून श्रद्धेशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होऊ शकेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule