हिरो मोटोकॉर्पची 'विडा व्ही२ गो एफबी' इलेक्ट्रिक स्कूटर लाँच
मुंबई, 02 ऑगस्ट (हिं.स.)। हिरो मोटोकॉर्पने आपल्या ''विडा'' या इलेक्ट्रिक ब्रँडअंतर्गत व्ही२ मालिकेत ''विडा व्ही२ गो एफबी'' ही नवीन फिक्स्ड बॅटरी व्हेरिएंट भारतीय बाजारात सादर केला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १.१३ लाख रुपये ठे
Hero MotoCorp Launches  Vida V2 Go FB Electric Scooter


मुंबई, 02 ऑगस्ट (हिं.स.)। हिरो मोटोकॉर्पने आपल्या 'विडा' या इलेक्ट्रिक ब्रँडअंतर्गत व्ही२ मालिकेत 'विडा व्ही२ गो एफबी' ही नवीन फिक्स्ड बॅटरी व्हेरिएंट भारतीय बाजारात सादर केला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १.१३ लाख रुपये ठेवण्यात आली असून, काढता येणाऱ्या बॅटरीऐवजी थेट प्लग-इन चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. घरातच चार्जिंगची सोय असलेल्या आणि दररोज बॅटरी काढून चार्ज करण्याचा त्रास टाळू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय अधिक सोयीस्कर ठरणार आहे.

नवीन व्ही२ गो एफबीमध्ये ३.१ किलोवॅट अवर क्षमतेची फिक्स्ड बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर एका चार्जमध्ये आयडीसी प्रमाणित १२८ किलोमीटरपर्यंत धावू शकते. यामध्ये ६ किलोवॅट क्षमतेची स्विंगआर्म माउंटेड इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून, स्कूटरचा कमाल वेग ताशी ७० किलोमीटर आहे. डीसी फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे ही स्कूटर केवळ ६५ मिनिटांत शून्य ते ८० टक्के चार्ज होते. त्यामुळे रोजच्या शहरातील प्रवासासाठी ही स्कूटर अधिक उपयुक्त मानली जात आहे.

सुविधांच्या बाबतीतही व्ही२ गो एफबीमध्ये आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात ४.३ इंचांचा एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असून, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशनची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय सीटखाली २७.२ लिटरची स्टोरेज क्षमता आणि लांब सिंगल पीस सीट देण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन वापरात आराम आणि उपयुक्तता दोन्ही मिळतात.

ग्राहकांना चार्जिंगच्या विविध पर्यायांची निवड उपलब्ध करून देण्यासाठी विडा ब्रँडने आता फिक्स्ड बॅटरी आणि रिमुव्हेबल बॅटरी असे दोन्ही पर्याय उपलब्ध केले आहेत. त्यामुळे अपार्टमेंटमध्ये राहणारे तसेच स्वतंत्र घरांमध्ये चार्जिंगची सुविधा असलेले ग्राहक त्यांच्या गरजेनुसार योग्य मॉडेल निवडू शकतात.

या नवीन व्हेरिएंटच्या समावेशानंतर विडा व्हीएक्स२ मालिकेत आता चार वेगवेगळे बॅटरी पॅक आणि एकूण पाच व्हेरिएंट उपलब्ध झाले आहेत. या मालिकेतील सर्वात लहान २.२ किलोवॅट अवर बॅटरी पॅक ९३ किलोमीटरची रेंज देतो, तर सर्वात मोठा ४.४ किलोवॅट अवर बॅटरी पॅक तब्बल १८७ किलोमीटरपर्यंत धावण्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे विविध बजेट आणि वापराच्या गरजांनुसार ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

भारतात वाढत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हिरो मोटोकॉर्पने सादर केलेली विडा व्ही२ गो एफबी ही स्कूटर शहरातील ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande