ट्रम्प यांच्यासारखा नेता इराणने कधीही पाहिला नसेल- मार्को रुबिओ
वॉशिंग्टन, 02 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) तेहरानविरोधातील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ठाम धोरणाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, इराणी सरकारचा यापूर्वी कधीही अशा अमेरिकन नेत्याशी
ट्रम्प यांच्यासारखा नेता इराणने कधीही पाहिला नसेल- मार्को रुबिओ


वॉशिंग्टन, 02 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) तेहरानविरोधातील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ठाम धोरणाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, इराणी सरकारचा यापूर्वी कधीही अशा अमेरिकन नेत्याशी सामना झाला नव्हता, जो इतकी थेट आणि स्पष्ट कृती करतो.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रुबिओ यांनी इस्लामिक रिपब्लिक इराणबाबत वॉशिंग्टनच्या भूमिकेवर भाष्य केले आणि पूर्वीच्या धोरणांपेक्षा झालेल्या मोठ्या बदलावर भर दिला. ते म्हणाले की, तेहरान आता परिणामांपासून वाचण्यासाठी जुन्या पद्धतींवर अवलंबून राहू शकत नाही.

रुबिओ म्हणाले, “मला वाटत नाही की इराणी सरकारचा यापूर्वी ट्रम्प यांच्यासारख्या राष्ट्राध्यक्षांशी सामना झाला आहे, जे प्रत्यक्षात कृती करतात. गेल्या २०–३० वर्षांपासून त्यांना अशी सवय झाली होती की, केवळ अमेरिका नव्हे तर संपूर्ण जग त्यांना खोटे बोलणे, करार मोडणे आणि इतर अशा कृती करूनही त्यातून सहज सुटू देत होते.”

अलीकडील लष्करी कारवायांच्या परिणामांबाबत बोलताना रुबिओ यांनी दावा केला की अमेरिकन हल्ल्यांमुळे इराणची संरक्षण क्षमता मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली आहे. त्यांच्या मते, इराणी सरकारने आपले ते पारंपरिक सुरक्षा कवच गमावले आहे, ज्यावर ते पूर्वी स्वतःच्या सुरक्षेसाठी अवलंबून होते.

रुबिओ यांनी मान्य केले की, “त्यांच्याकडे अजूनही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन आहेत आणि ते अजूनही नुकसान करू शकतात.” मात्र, त्यांनी यावर भर दिला की इराणकडे आता ते मजबूत संरक्षण कवच उरलेले नाही, ज्यामागे ते सुरक्षित राहू शकत होते.

त्यांनी सांगितले की, याच कारणामुळे इराण आता अण्वस्त्र कार्यक्रम समाप्त करणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीशी संबंधित करारांवर चर्चा करण्यासाठी उत्सुक दिसत आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की वॉशिंग्टन सध्या मजबूत भूमिकेतून वाटाघाटी करत आहे.ते पुढे म्हणाले, “यामुळेच संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. ते आता अण्वस्त्र कार्यक्रम संपवण्यास आणि सामुद्रधुनीसंदर्भातील करार करण्यास तयार आहेत, काही बाबतींत तर त्यासाठी उत्सुकही दिसतात. कारण आता आम्ही त्यांच्याशी कमकुवत नव्हे तर मजबूत स्थितीतून संवाद साधत आहोत.”

तेहरानच्या परराष्ट्र धोरणातील उद्दिष्टांचा आणि मध्यपूर्वेत आपला प्रभाव वाढवण्याच्या दीर्घकालीन प्रयत्नांचा उल्लेख करताना रुबिओ यांनी सांगितले की, त्या शासनाचा प्रादेशिक प्रभाव रोखण्यासाठी वॉशिंग्टनला दबाव आणखी वाढवावा लागेल.रुबिओ पुढे म्हणाले, “त्यांना त्यांची क्रांती इतर देशांत पसरवायची आहे. हे बदलले पाहिजे आणि ते बदलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याची किंमत इतकी वाढवणे की ती त्यांना परवडणार नाही.”

रुबिओ यांच्या विधानानंतर काही तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर होणारा नियोजित हल्ला रद्द केल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, फारसच्या आखातातील या देशासोबत लवकरच एखादा करार होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.याशिवाय, या प्रयत्नांमध्ये इस्रायलदेखील आपल्या बांधिलकीसह सहभागी असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande