
नवी दिल्ली , 02 ऑगस्ट (हिं.स.)।लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फ्रेंडशिप डे निमित्त ‘जेन- जी’ शैलीतील आपला वेगळा अंदाज दाखवला. त्यांनी के- पॉप शैलीतील ‘फिंगर हार्ट’ जेश्चर करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओही शेअर करत, आपण तरुणांकडून दररोज काहीतरी नवीन शिकत असल्याचे सांगितले.
इन्स्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर करत राहुल गांधी यांनी लिहिले, “मी अजूनही विद्यार्थीच आहे. दररोज काहीतरी नवीन शिकत आहे. आजचा धडा असा की, आज फ्रेंडशिप डे आहे आणि हे एक हृदय आहे. सर्वांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा. खूप सारा प्रेम.”
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस खासदार राहुल गांधी सोशल मीडिया, अनौपचारिक संवाद आणि विविध विशेष मोहिमांद्वारे तरुणांशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. अलीकडच्या काही महिन्यांत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रश्नपत्रिका गळती, बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. याशिवाय, आपल्या भाषणांमध्ये आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये ते वारंवार ‘जेन-जी पिढीचा उल्लेख करताना दिसतात.
राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून करिअर, चिंता, शिक्षण आणि लोकशाही यांसारख्या विषयांवरील व्हिडिओदेखील शेअर केले आहेत. तसेच ‘विद्यार्थ्यांचा आवाज’ अभियानादरम्यान त्यांनी तरुणांना परीक्षा प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भरती प्रक्रियेतील समस्यांविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले होते.
एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी तरुणांना सल्ला देताना म्हटले होते की, “जीवनात कोणतीही गोष्ट सरळ आणि सोपी नसते. त्यामुळे लवचिकता आणि मानसिक ताकद कायम ठेवणे आवश्यक आहे.” याच संवाद मालिकेचा भाग म्हणून फ्रेंडशिप डे निमित्त राहुल गांधी यांनी ‘फिंगर हार्ट’ या प्रतीकाचा वापर केला.
‘फिंगर हार्ट’ हा एक अत्यंत लोकप्रिय हातवारा (जेश्चर) असून त्याची सुरुवात दक्षिण कोरियामध्ये झाली. के- पॉप संगीत आणि के-ड्रामा यांच्या माध्यमातून तो जगभर लोकप्रिय झाला आहे. या जेश्चरमध्ये अंगठा आणि तर्जनी (पहिले बोट) एकमेकांवर क्रॉस करून छोट्या हृदयाचा आकार तयार केला जातो. प्रेम, कृतज्ञता, मैत्री आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी याचा वापर केला जातो. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि एक्स यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणांमध्ये हा जेश्चर विशेष लोकप्रिय आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode