
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट (हिं.स.)। पुढील नव्या व्यापारी आठवड्यात प्राथमिक समभाग विक्री अर्थात आयपीओ बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे. ३ ऑगस्टपासून ७ ऑगस्टदरम्यान एकूण सहा नवीन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुले होणार आहेत. यामध्ये दोन मेनबोर्ड कंपन्यांचे आणि चार एसएमई विभागातील आयपीओचा समावेश आहे. मेनबोर्डमध्ये आरडी इंडस्ट्रीज आणि टेक्नोक्राफ्ट व्हेंचर्स या कंपन्या असतील, तर एसएमई विभागात ऑप्टिमिस्टिक्स एंटरटेनमेंट इंडिया, एलएपीएल ऑटोमोटिव्ह, एजियस टेक्नॉलॉजीज आणि अनाविल वायर अँड इंजिनिअरिंग या कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होणार आहेत. सध्या उपलब्ध ग्रे मार्केट प्रीमियम अर्थात जीएमपीनुसार अनाविल वायर अँड इंजिनिअरिंगचा आयपीओ सर्वाधिक चर्चेत आहे.
अनाविल वायर अँड इंजिनिअरिंगचा आयपीओ ३ ऑगस्ट रोजी खुला होऊन ५ ऑगस्टला बंद होईल. या इश्यूसाठी प्रति समभाग २५७ ते २७० रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. एका लॉटमध्ये ४०० समभागांचा समावेश असून गुंतवणूकदारांना किमान एक लॉटसाठी अर्ज करावा लागणार आहे. सध्या या आयपीओचा जीएमपी ९० रुपये असल्याचे सांगितले जात असून, तो या आठवड्यातील सर्वाधिक मानला जात आहे. मात्र, लिस्टिंगपर्यंत जीएमपीमध्ये बदल होऊ शकतो.
एजियस टेक्नॉलॉजीजचा आयपीओ ४ ऑगस्टपासून ६ ऑगस्टपर्यंत खुला राहणार आहे. या आयपीओचा प्राइस बँड १०० ते १०५ रुपये असून एका लॉटमध्ये १२०० समभाग असतील. सध्या या आयपीओचा जीएमपी शून्य रुपये आहे.
आरडी इंडस्ट्रीजचा मेनबोर्ड आयपीओ ५ ऑगस्टपासून ७ ऑगस्टपर्यंत खुला राहील. या इश्यूचा प्राइस बँड ५० ते ५३ रुपये निश्चित करण्यात आला असून एका लॉटमध्ये २८१ समभाग असतील. या आयपीओचा सध्याचा जीएमपी ७ रुपये असल्याचे समोर आले आहे.
एलएपीएल ऑटोमोटिव्हचा आयपीओ ६ ऑगस्टपासून १० ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या इश्यूचा प्राइस बँड ८८ ते ९४ रुपये असून एका लॉटमध्ये १२०० समभागांचा समावेश आहे. या आयपीओचा जीएमपी सध्या २२ रुपये इतका आहे.
ऑप्टिमिस्टिक्स एंटरटेनमेंट इंडिया आणि टेक्नोक्राफ्ट व्हेंचर्स या दोन्ही कंपन्यांचे आयपीओ ७ ऑगस्टपासून ११ ऑगस्टपर्यंत खुले राहणार आहेत. या दोन्ही आयपीओंसाठी प्राइस बँड आणि लॉट साइजची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. तसेच दोन्ही कंपन्यांचा सध्याचा जीएमपी शून्य रुपये असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात विविध क्षेत्रांतील सहा नव्या आयपीओंमुळे प्राथमिक बाजारात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असून, गुंतवणूकदारांचे लक्ष विशेषतः अनाविल वायर अँड इंजिनिअरिंगच्या कामगिरीकडे लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule