
पालघर, 02 ऑगस्ट (हिं.स.) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुब्रोतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा ए.ई.सी.एस. मैदान, TAPS, बोईसर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील शालेय संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.
स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात १६ संघ, १५ वर्षांखालील मुलांच्या गटात ८ संघ आणि १७ वर्षांखालील मुलींच्या गटात ४ संघांनी सहभाग घेतला. चुरशीच्या लढती, कौशल्यपूर्ण खेळ आणि खेळाडूवृत्तीमुळे संपूर्ण स्पर्धा रंगतदार ठरली.
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात तारापूर विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, बोईसर संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद पटकावले. ए.ई.सी.एस. स्कूल क्रमांक २ ने उपविजेतेपद, तर चिन्मया विद्यालय, बोईसरने तृतीय क्रमांक मिळविला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघरने विजेतेपदावर नाव कोरले. ए.ई.सी.एस. स्कूल क्रमांक ३ ने उपविजेतेपद मिळविले, तर तारापूर विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, बोईसर संघाने तृतीय क्रमांक पटकावत सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडली.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात डॉन बॉस्को स्कूल, बोईसरने विजेतेपद मिळविले. तर तारापूर विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, एमआयडीसी, बोईसर संघाने उपविजेतेपद मिळवत जिल्ह्यातील महिला फुटबॉलमधील आपले कौशल्य अधोरेखित केले.
स्पर्धेचे नियोजन व आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरीत्या पार पडले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पंच, प्रशिक्षक, सहभागी शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, स्वयंसेवक आणि आयोजक समिती यांनी योगदान दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी