
वॉशिंग्टन, 02 ऑगस्ट (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत इराण विरुद्धचे युद्ध संपवण्याची घोषणा केली आहे. वृत्तानुसार, ट्रम्प यांनी दावा केला आहे की पश्चिम आशियातील सहयोगी देशांनी इराणसोबत सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी सहमती दर्शवली आहे. तसेच त्यांनी असेही सांगितले की अमेरिका आता इराणवर कोणतेही नवीन हल्ले करणार नाही.
शनिवारी संध्याकाळी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की पश्चिम आशियातील सहयोगी देशांनी इराणसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी एका कराराच्या आराखड्यावर सहमती दर्शवली आहे. त्यांनी म्हटले की या प्रगतीच्या पार्श्वभूमीवर, सुमारे पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षात सध्या तरी नवीन लष्करी कारवाईचे आदेश दिले जाणार नाहीत.
ट्रम्प यांनी सांगितले की प्रस्तावित करारामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी तात्काळ आणि पूर्णपणे खुली करणे तसेच इराणच्या अण्वस्त्र धोक्याचा कायमस्वरूपी अंत करणे यांचा समावेश असेल. ट्रम्प यांनी लिहिले, “जगाच्या हिताचा आणि यशस्वी व समृद्ध इराणच्या अस्तित्वाचा विचार करून मी सध्या हल्ला रद्द करण्यास सहमती दिली आहे, मात्र त्यासाठी लवकरात लवकर करार होणे आवश्यक आहे.” ट्रम्प यांनी असा दावाही केला की इस्रायलने अमेरिकेसोबत मिळून इराणबरोबरचा हा करार पूर्ण करण्याची बांधिलकी व्यक्त केली आहे, ज्यामुळे युद्ध समाप्त होण्याचा मार्ग मोकळा होईल.
यापूर्वी शनिवारी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी इराणविरोधात अमेरिकेकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य लष्करी कारवाईबाबत चिंता व्यक्त केली आणि संघर्ष अधिक तीव्र न करण्याची विनंती ट्रम्प यांना केली होती.
ही चर्चा अशा वेळी झाली, जेव्हा ट्रम्प यांनी सैन्याला इराणवर नवीन हल्ल्यांची तयारी करण्याचे निर्देश दिले होते. सौदी अरेबियाला अशी भीती होती की जर अमेरिकेने इराणच्या ऊर्जा क्षेत्रावर किंवा इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर हल्ला केला, तर तेहरान त्याला प्रत्युत्तर म्हणून सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांतील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करू शकते.
या आठवड्याच्या सुरुवातीला सौदी अरेबियाने इराकमधील इराणसमर्थक मिलिशियांच्या अनेक रसद व शस्त्रसाठा केंद्रांवर अमेरिकेने केलेल्या कारवाईला पाठिंबा दिला होता. मात्र, रियाध सातत्याने अमेरिका आणि इराण यांच्यात संवादाद्वारे हा वाद सोडवण्याचा आग्रह धरत होता.याच पार्श्वभूमीवर सौदीचे संरक्षणमंत्री आणि युवराजांचे बंधू खालिद बिन सलमान बुधवारी वॉशिंग्टन येथे पोहोचले होते. त्यांनी ट्रम्प आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन इराणविषयक धोरणावर चर्चा केली.
मंगळवारी ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचीही भेट घेतली होती. फेब्रुवारीमध्ये इराण युद्ध सुरू झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांची ही पहिली प्रत्यक्ष भेट होती. नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना इराणविरोधातील लष्करी मोहीम सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते.
मात्र आता अचानक ट्रम्प यांनी इराण युद्ध समाप्त करण्यासाठी सहमती झाल्याची घोषणा करून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. हे युद्ध ट्रम्प आणि त्यांच्या पक्षासाठी राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अनेक अमेरिकन नागरिकांमध्ये हे युद्ध अलोकप्रिय ठरत असून, नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम झालेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode