
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट (हिं.स.)भारतीय क्रिकेट संघातून बऱ्याच काळापासून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आता मौन सोडले आहे. तो म्हणतो की, टीम इंडियामध्ये परतणे आता त्याच्यासाठी प्राधान्याचे राहिलेले नाही आणि संघाबाहेरील जीवनात आनंदी राहायला तो शिकला आहे.
भारताचा माजी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन म्हणाला होता की, भुवनेश्वर कुमारचा टीम इंडियामध्ये समावेश केला पाहिजे. अश्विनने म्हटले होते की, पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला भुवनेश्वर कुमारची गरज भासेल.
तो टीम इंडियामध्ये परत येईल की नाही याची भुवनेश्वरला आता पर्वा नाही. त्याने म्हटले आहे की, तो केवळ आवडीपोटी खेळत आहे. भुवनेश्वर २०२२ पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. पण, तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला सलग दोन आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
एका पॉडकास्टवर बोलताना, भुवनेश्वर कुमार टीम इंडियामध्ये परतण्याबद्दल म्हणाला, मी भारतासाठी खेळलो आहे. ही काही मिळवण्याची गोष्ट नाही. जर मला पुन्हा संधी मिळाली, तर ते उत्तमच आहे, पण मी तिथे होतो. मी सध्या जे काही करत आहे, ते खेळावरील प्रेमापोटी करत आहे. मला माहित आहे की मला शिस्तबद्ध राहावे लागेल.
तो पुढे म्हणाला, मी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. मी यूपी टी२० लीग खेळत आहे. मला खात्री करायची आहे की मी क्रिकेटच्या सतत संपर्कात राहीन आणि त्याचबरोबर स्वतःला सावरण्यासाठी आवश्यक विश्रांतीही देईन.
भुवनेश्वरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त आपल्या आयुष्यात पुढे जाण्यास मदत केल्याबद्दल आपल्या कुटुंबाचे आभार मानले. तो म्हणाला, मी सध्या शांततापूर्ण जीवन जगत आहे. त्यासाठी मी माझ्या कुटुंबाचे आभार मानतो. घरी आम्ही क्रिकेटबद्दल अजिबात बोलत नाही. मी टीम इंडियामध्ये परत येईन की नाही किंवा माझी निवड का होत नाही, याबद्दल आम्ही बोलत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे