
गांधीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात चर्चेत आलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दिपके पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. सुरत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवानराव दिपके यांच्या आर्थिक व्यवहारांची अधिकृत चौकशी करण्याची मागणी केली आहे. भगवानराव दिपके हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पगाराच्या तुलनेत मुलाच्या अमेरिकेतील उच्च शिक्षणाचा खर्च कसा उचलण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करत तिवारी यांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
अमित तिवारी यांनी सांगितले की, त्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी अधिकृत तक्रारी सादर केल्या आहेत. कॉकरोच जनता पार्टीविरोधात भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, कपिल सिब्बल यांनी दिल्याचा दावा करण्यात आलेल्या एक कोटी रुपयांच्या निधीबाबत केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाकडेही तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय भगवानराव दिपके यांच्या आर्थिक मालमत्तेची आणि उत्पन्नाच्या स्रोतांची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडे करण्यात आली आहे.
तिवारी यांच्या मते, भगवानराव दिपके यांना कनिष्ठ अभियंता म्हणून सुमारे ६० ते ६५ हजार रुपये मासिक वेतन मिळत होते. अशा परिस्थितीत मुलाच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी लागणारा मोठा आर्थिक खर्च कशा प्रकारे उचलण्यात आला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या चौकशीत जर बेहिशेबी मालमत्ता किंवा उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळून आली, तर संबंधितांवर कायदेशीर आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याचबरोबर कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर सीजेपी ही संस्था राजकीय पक्षाप्रमाणे काम करत असेल, देणग्या स्वीकारत असेल आणि सार्वजनिक स्वरूपात राजकीय उपक्रम राबवत असेल, तर लोकप्रतिनिधी कायदा १९५१ मधील कलम २९-अ अंतर्गत तिची नोंदणी करणे बंधनकारक ठरते. नोंदणी नसतानाही मोठ्या प्रमाणात निधी स्वीकारल्याचा आरोप करत त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या तक्रारींमुळे अभिजीत दिपके आणि कॉकरोच जनता पार्टी नव्या वादात अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या आरोपांवर अभिजीत दिपके किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. संबंधित यंत्रणा या तक्रारींची प्राथमिक छाननी करून पुढील निर्णय घेणार असल्याने या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule