
तिरुवनंतपुरम, 02 ऑगस्ट (हिं.स.) मुसळधार पावसामुळे दक्षिण भारतीय राज्यांमध्ये हाहाकार माजला आहे. केरळममध्ये पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामुळे हजारो लोकांना आपली घरे सोडून पलायन करण्यास भाग पडले आहे. दरम्यान, शेजारील कर्नाटकातील शिवमोग्गा येथे भूस्खलनात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केरळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण बेपत्ता आहेत. राज्य सरकारने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, २०९ मदत शिबिरे उभारून ५ हजार ७९२ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १३ जण जखमी झाले आहेत. राज्यातील २७ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, १९६ घरांचे नुकसान झाले आहे. अलाप्पुझा जिल्ह्यातील कुट्टनाड आणि अप्पर कुट्टनाड परिसरात पुराचा धोका वाढला आहे. पंबा आणि अचन्कोविल नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. वीयपुरम आणि चेरुथाना गावांमध्ये पुरामुळे १०० हून अधिक घरांना फटका बसला आहे. अलाप्पुझामध्ये सध्या ११ मदत शिबिरे सुरू असून, त्यामध्ये १६९ कुटुंबांतील ५८० नागरिक आश्रय घेत आहेत.
कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मल्लिकार्जुन (३५), त्यांची पत्नी नागवेणी (२८) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा संतोष यांचा समावेश आहे. डोंगरालगत असलेल्या घरात हे कुटुंब झोपले असताना अचानक दरड कोसळल्याने ही दुर्घटना घडली. प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. या नैसर्गिक संकटामुळे प्रशासन आणि बचाव यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule