
धुळे, 24 ऑगस्ट (हिं.स.) | मानवी आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या बनावट विदेशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवलेला मोठा साठा धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि साक्री पोलिसांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. या कारवाईत ६२ लाख ८८ हजार रुपये किमतीची बनावट विदेशी दारू आणि १० लाख रुपये किमतीचे टाटा टर्बो वाहन असा एकूण ७२ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लघडवाळ गावाजवळ एका घरासमोर लाल रंगाचे टाटा टर्बो वाहन उभे असल्याचे आढळले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी दारूचा साठा आढळून आला. या प्रकरणी राकेश धनलाल भोये (वय २६, रा. धनकवडी, पारगाव, ता. साक्री, जि. धुळे) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या साठ्यामध्ये बनावट बाटल्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एकूण ६५५ खोके असून प्रत्येक खोक्यात ४८ सीलबंद बाटल्या आहेत. विनापरवाना आणि मानवी जीवितास घातक ठरू शकणाऱ्या बनावट विदेशी दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा वाहनात लपवून ठेवण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, ३३६ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(अ)(ई) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर