लातुरात देशी दारूची अवैध वाहतूक उघड; २,३०० बाटल्यांसह आल्टो कार जप्त
लातूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत देशी दारूच्या २३ बॉक्समधील तब्बल २ हजार ३०० बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरलेली आल्टो कार असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस कारवाई


लातूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। अवैध दारू विक्री व वाहतुकीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत देशी दारूच्या २३ बॉक्समधील तब्बल २ हजार ३०० बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरलेली आल्टो कार असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.१० वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मांजरा कारखाना ते चिंचोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला होता. सकाळी सुमारे ७.४० वाजता एमएच-२४-सी-७९५४ क्रमांकाची आल्टो कार संशयावरून थांबवून तिची झडती घेण्यात आली.

कारमध्ये खाकी रंगाचे २३ बॉक्स आढळले. प्रत्येक बॉक्समध्ये ९० मिली क्षमतेच्या ‘सिमला संत्रा’ देशी दारूच्या १०० सिलबंद बाटल्या असल्याचे आढळून आले. एकूण २ हजार ३०० बाटल्यांची किंमत ९२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी आल्टो कार, किंमत १ लाख ५० हजार रुपये, असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बालाजी प्रभाकर दुडलेवार (वय ४३, रा. शर्मा नगर, औराद, ता. निलंगा; सध्या रा. महादेव नगर, १२ नंबर पाटी, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. दारूची वाहतूक किंवा विक्री करण्याबाबत कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५(अ)(ई), ८१ व ८३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, वाहतूक तसेच इतर अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, नागरिकांनी अशा अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पोलीस विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande