रावेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या विद्युत केबलवर चोरट्यांचा डल्ला
जळगाव, २४ ऑगस्ट (हिं.स.) : रावेर तालुक्यातील पिंप्री शिवारासह परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री १५ ते २० शेतकऱ्यांच्या विद्युतपंपांच्या केबल चोरल्याची घटना समोर आली आहे. केबल चोरी करण्यापूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी पेटीतील कटाऊट आणि मेन स्वीचची त
रावेर तालुक्यात शेतकऱ्यांच्या विद्युत केबलवर चोरट्यांचा डल्ला


जळगाव, २४ ऑगस्ट (हिं.स.) : रावेर तालुक्यातील पिंप्री शिवारासह परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री १५ ते २० शेतकऱ्यांच्या विद्युतपंपांच्या केबल चोरल्याची घटना समोर आली आहे. केबल चोरी करण्यापूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी पेटीतील कटाऊट आणि मेन स्वीचची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना केबल चोरीसोबतच दुरुस्तीचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

पिंप्री, तराई पट्टी, मंगरूळचा काही भाग आणि परिसरातील विविध शेतांमध्ये चोरट्यांनी रात्रीच्या वेळी विद्युतपंपांच्या केबलवर डल्ला मारला. केबल चोरी झाल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे कठीण झाले असून, नवीन केबल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

या परिसरात यापूर्वीही विद्युत केबल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये तपास करून चोरट्यांना पकडण्यात आले होते. मात्र आता पुन्हा केबल चोरीच्या घटना वाढल्याने चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

रात्रीच्या वेळी शेतांमध्ये जाणे धोकादायक ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचाच फायदा चोरटे घेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

मंगरूळ शिवारातील गट क्रमांक २४९ मधील उषा युवराज महाजन यांच्या शेतातील कूपनलिकेतील विद्युत केबल चोरट्यांनी लंपास केली. त्यापूर्वी पेटीतील कटाऊट आणि मेन स्वीचची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी पिंप्री येथील अशोक रामू महाजन यांनी तक्रार दाखल केली आहे.

काही शेतांमध्ये केबल चोरी करताना अडथळा ठरणाऱ्या कूपनलिकेतील पीव्हीसी पाइपच्या केसिंगचीही तोडफोड करण्यात आली आहे. अशा ठिकाणी संपूर्ण पाइप बाहेर काढून पुन्हा वीज जोडणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढत आहे.

पिंप्रीसह परिसरातील शिवारात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून केबल चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. चोरीच्या घटना थांबल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे. पिकांना पाणी देण्याच्या हंगामात अशा चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande