
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट (हिं.स.)। आभूषण निर्मिती करणारी कंपनी प्रायोरिटी ज्वेल्स लिमिटेडचा आरंभिक सार्वजनिक निर्गम (आयपीओ) २८ ऑगस्टला खुला होणार आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार १ सप्टेंबरपर्यंत बोली लावू शकतात. यासाठी किंमत श्रेणी (प्राइस बँड) १९०-२०० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
प्रायोरिटी ज्वेल्स लिमिटेडच्या या आयपीओअंतर्गत ४५.७५ लाखांपर्यंत नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या इश्यूमध्ये गुंतवणूकदार किमान ७५ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ७५ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठे (अँकर) गुंतवणूकदार २७ ऑगस्टला बोली लावू शकतात. कंपनी नवीन शेअर्स जारी करून उभारलेल्या रकमेचा वापर कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी आणि सामान्य कामकाजासाठी करणार आहे. कंपनीचे शेअर्स ४ सप्टेंबरला बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
उल्लेखनीय म्हणजे, २००७ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी हलक्या वजनाचे, परवडणारे तसेच हिरे जडवलेले सोने आणि प्लॅटिनमचे उत्कृष्ट दागिने डिझाइन करणे, मॅन्युफॅक्चरिंग तसेच विक्रीचे काम करते. ही कंपनी भारतासोबतच निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये स्वतंत्र ज्वेलर्स आणि ज्वेलरी चेनना थेट आपली उत्पादने विकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule