पश्चिम आशियातील तणावाच्या शक्यतेने शेअर बाजारात घसरण
गुंतवणूकदारांना १.१३ लाख कोटींचा फटका नवी दिल्ली, 24 ऑगस्ट (हिं.स.)। अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने जागतिक शेअर बाजारांमध्ये आज चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. आजच
Stock Market Closing


गुंतवणूकदारांना १.१३ लाख कोटींचा फटका

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट (हिं.स.)। अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने जागतिक शेअर बाजारांमध्ये आज चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. आजच्या व्यवहाराची सुरुवात सकारात्मक झाली असली तरी काही वेळातच विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीस लागले. दिवसअखेर सेन्सेक्स १७१.७२ अंकांनी म्हणजेच ०.२२ टक्क्यांनी घसरून ७७,३६९.११ अंकांवर, तर निफ्टी ३२.९५ अंकांनी म्हणजेच ०.१४ टक्क्यांनी घसरून २४,२१९.०५ अंकांवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८८.७३ अंकांच्या वाढीसह ७७,६२९.५६ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या खरेदीमुळे तो काही वेळात २४८.५७ अंकांनी वाढून ७७,७८९.४० अंकांपर्यंत पोहोचला. मात्र ही तेजी टिकली नाही. विक्रीचा दबाव वाढल्यानंतर सेन्सेक्स दुपारी सुमारे दोन वाजता ३३९.१७ अंकांच्या घसरणीसह ७७,२०१.६६ अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर झालेल्या खरेदीमुळे काही प्रमाणात सुधारणा झाली.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३३.०५ अंकांच्या वाढीसह २४,२८५.०५ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या पाच मिनिटांत तो ६१ अंकांनी वाढून २४,३१३ अंकांवर पोहोचला. त्यानंतर विक्री वाढल्याने निफ्टी १०७.७० अंकांच्या घसरणीसह २४,१४४.३० अंकांपर्यंत खाली आला. अखेरच्या टप्प्यात झालेल्या खरेदीमुळे त्याला काहीसा आधार मिळाला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये धातू क्षेत्राची कामगिरी सर्वाधिक चांगली राहिली. मुंबई शेअर बाजाराचा मेटल इंडेक्स १.३८ टक्क्यांनी वाढला. माहिती-तंत्रज्ञान, एफएमसीजी, रिअल्टी, आरोग्यसेवा तसेच तेल आणि वायू क्षेत्रातील समभागही वाढीसह बंद झाले. दुसरीकडे बँकिंग, ग्राहक टिकाऊ वस्तू, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, मीडिया, भांडवली वस्तू आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव राहिला. व्यापक बाजारात निफ्टी मिडकॅप ०.१३ टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप ०.२६ टक्क्यांनी घसरला.

बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल १.१३ लाख कोटी रुपयांची घट झाली. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य शुक्रवारी ४९३.१२ लाख कोटी रुपये होते. आज ते घटून ४९१.९९ लाख कोटी रुपये झाले. दिवसभरातील व्यवहारादरम्यान, बीएसईवर ४,६८८ शेअर्सचा सक्रियपणे व्यवहार झाला. यापैकी २,०३९ शेअर्स वाढीसह बंद झाले, २,४०० मध्ये घट झाली आणि २४९ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. एनएसईवर ३,१३८ शेअर्सचा सक्रियपणे व्यवहार झाला. यापैकी १,४५८ शेअर्स वाढीसह बंद झाले, तर १,६८० शेअर्स घसरणीसह बंद झाले. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी ९ शेअर्स वाढीसह, २० शेअर्स घसरणीसह बंद झाले आणि एक शेअर स्थिर राहिला. निफ्टीमधील ५० शेअर्सपैकी २३ शेअर्स वाढीसह, २६ शेअर्स घसरणीसह बंद झाले आणि एक शेअर कोणताही चढ-उतार न होता बंद झाला.

आजच्या व्यवहारात जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे प्रमुख वाढणारे समभाग ठरले. तर एसबीआय लाइफ इन्शुरन्स, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, बजाज फिनसर्व्ह आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या समभागांमध्ये घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande