
काबुल, 24 ऑगस्ट (हिं.स.) भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ जाहीर करण्यात आला आहे. इब्राहिम झद्रान संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. टी-२० कर्णधार म्हणून ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही मालिका १३ ते १७ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत होणार आहे. अफगाणिस्तान या मालिकेचे यजमानपद भूषवणार असून, भारताचे यजमानपद भूषवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.
वेगवान गोलंदाज नवीन उल हक दुखापतीतून परतला आहे. तो डिसेंबर २०२४ नंतर प्रथमच खेळणार आहे. उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे नवीनला या वर्षाच्या सुरुवातीला झालेला टी-२० विश्वचषकही गमवावा लागला होता. नवीनसोबतच अफगाण संघाने चार वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे: फजल हक फारुकी, अब्दुल्ला अहमदझाई आणि अझमतुल्ला ओमरझाई. अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू गुलबदिन नायबचेही संघात पुनरागमन झाले आहे.
नूर रहमान या नव्या क्रिकेटपटूचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो दुसरा यष्टीरक्षक असेल. त्याने अलीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. फिरकी गोलंदाजी विभागात रशीद खान, नूर अहमद आणि मुजीब उर रहमान यांचा समावेश आहे. मोहम्मद नबीचीही निवड झाली आहे. झद्रान व्यतिरिक्त, फलंदाजीच्या फळीत रहमानुल्ला गुरबाज, सादिकुल्ला अटल आणि दरविश रसूली यांचा समावेश आहे. अफगाणिस्तान संघात तीन क्रिकेटपटूंना राखीवही ठेवण्यात आले आहे.
भारताविरुद्ध अफगाणिस्तानचा टी२० संघ
इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), नूर रहमान (यष्टीरक्षक), सादिकुल्ला अटल, दरविश रसूली, अझमतुल्ला ओमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान, नांग्याल खरोटिया, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, अब्दुल्ला अहमदझाई आणि नवीन उल हक.
राखीव क्रिकेटपटू: एजाज अहमदझाई, शाहिदुल्ला कमाल आणि फरीद अहमद.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे