
नाशिक, 24 ऑगस्ट (हिं.स.)। मित्र-मैत्रिणीच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून युवतीने गळफास घेऊन युवतीने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी यांची १७ वर्षीय मुलगी हिच्याशी आरोपी दिशांत अहिरे याने मुलगी दहावीत शिकत असताना तिच्याशी मैत्री केली होती, तसेच तो एका खुशी नावाच्या मुलीशीही मैत्री करीत होता. तो फिर्यादीच्या मुलीला तू माझा नाद सोडून दे. माझे खुशीसोबत प्रेमसंबंध आहेत, असे म्हणत असे. तसेच खुशी नावाची मुलगीसुद्धा फिर्यादीच्या मुलीला भेटून तिला त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या मुलीने राहत्या घरी बेडरूममध्ये सिलिंग फॅनच्या हुकाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादीच्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दिशांत अहिरे व त्याच्या मैत्रिणीविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI