

- राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचा माधव नेत्रालयात शुभारंभ
- बालाघाटमधील कारंजासाठी माधव नेत्रालयाचा पुढाकार
नागपूर, 25 ऑगस्ट (हिं.स.) : आपण स्वतः कमावलेल्या धनाचे, मिळवलेल्या ज्ञानाचे किंवा स्वतःच्या मालकीच्या वस्तूचे दान करता येते. मात्र, नेत्र अथवा शरीरातील अवयव हे परमेश्वराने आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे मृत्यूनंतर एखाद्याला नेत्रज्योती किंवा अवयव उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला ‘दान’ म्हणणे कितपत योग्य आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. ‘नेत्रदान’ या शब्दाला पर्यायी शब्द शोधण्याची गरज असून, ‘नेत्रदान पंधरवडा’ऐवजी ‘नेत्रदान संकल्प पंधरवडा’ असे संबोधन अधिक योग्य ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यांनी केले.
नागपूर येथील माधव नेत्रालयात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागपूर एम्सचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, पिक्स ट्रान्समिशन लिमिटेडचे संचालक जो पॉल, माधव नेत्रालयाचे उपाध्यक्ष निखील मुंडले, सचिव अविनाश अग्निहोत्री, मेजर बाम तसेच भाऊसाहेब देवरस सेवा न्यास, कारंजाचे सचिव आणि हिंदुस्थान समाचारचे अध्यक्ष अरविंद मार्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी भय्याजी जोशी म्हणाले की, भाषेच्या व्यवहारात अनेकदा चुकीचे शब्द रूढ होतात. एखाद्यामध्ये शारीरिक उणीव असली तर त्याला ‘पंगू’ म्हटले जाते, तर पंगुत्व नसलेल्या व्यक्तीसाठी ‘अपंग’ हा शब्द वापरला जातो. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातही ‘ज्यासि अपंगिता नाही। त्यासि धरी जो हृदयीं।’ असा उल्लेख आढळतो. मात्र, व्यवहारात उणीव किंवा व्याधी असणाऱ्या व्यक्तींना ‘अपंग’ संबोधले जाते. त्यामुळे ‘दिव्यांग’ हा पर्यायी शब्द रूढ होणे स्वागतार्ह आहे. याच धर्तीवर ‘नेत्रदान’ या शब्दाचाही विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण स्वतः अर्जित केलेली वस्तू, धन किंवा विद्या इतरांना दिल्यास त्याला दान म्हणणे योग्य ठरते. मात्र, नेत्र अथवा शरीरातील अवयव आपण स्वतः कमावलेले नसून ते जन्मतःच परमेश्वराने दिलेले आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या पूर्वसंकल्पानुसार नातेवाईकांनी नेत्र अथवा अवयव गरजू व्यक्तीला उपलब्ध करून दिल्यास त्याला ‘दान’ म्हणणे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नेत्रदानाबाबत समाजात जनजागृती करण्याबरोबरच त्यामागील संकल्पनेला योग्य शब्द मिळणेही आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ‘नेत्रदान’ला पर्यायी शब्द शोधावा आणि ‘नेत्रदान पंधरवडा’ऐवजी ‘नेत्रदान संकल्प पंधरवडा’ असे संबोधन करावे, असे आवाहन भय्याजी जोशी यांनी केले. या काळात प्रत्यक्ष नेत्रदान होत नसून नागरिक नेत्रदानाचा संकल्प करतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कारंजात अत्याधुनिक नेत्रसेवा उपलब्ध होणार
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी तालुक्यातील कारंजा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे पैतृक गाव आहे. या ठिकाणी सध्या बालासाहेब भाऊराव देवरस सेवा न्यास कार्यरत आहे. परिसरात विविध सुविधा उपलब्ध असल्या तरी नेत्ररोगांच्या तपासणी व उपचारांसाठी अपेक्षित सुविधा उपलब्ध नसल्याने माधव नेत्रालयाने पुढाकार घेतला आहे.
या अंतर्गत अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून कारंजा परिसरातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी आणि नेत्रचिकित्सेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यासाठी माधव नेत्रालय आणि बालासाहेब भाऊराव देवरस सेवा न्यास यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या करारावर माधव नेत्रालयाच्या वतीने अविनाश अग्निहोत्री आणि बालासाहेब भाऊराव देवरस सेवा न्यासाच्या वतीने अरविंद मार्डीकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमामुळे कारंजा आणि परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक नेत्रसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी