यूट्यूबला टक्कर देण्यासाठी चिनी ‘बिलिबिली’चे ग्लोबल लाँच; भारतात प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह
मुंबई, 25 ऑगस्ट (हिं.स.)। यूट्यूबला टक्कर देण्यासाठी चीनमधील लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ‘बिलिबिली’ आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मला इंग्रजी भाषेत आणण्याची प्रक्रिया सुरू केली असून, ग
China Bilibili Set for Global Launch Challenge YouTube


मुंबई, 25 ऑगस्ट (हिं.स.)। यूट्यूबला टक्कर देण्यासाठी चीनमधील लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ‘बिलिबिली’ आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मला इंग्रजी भाषेत आणण्याची प्रक्रिया सुरू केली असून, ग्लोबल विस्तारासाठी विविध देशांमध्ये भरती प्रक्रियाही सुरू करण्याची तयारी केली आहे. लॉस एंजेलिस, लंडन, मेक्सिको सिटी, साओ पाउलो, इस्तंबूल आणि टोकियो या शहरांमध्ये सुरुवातीला कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘बिलिबिली’ हा चीनमधील व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असून, त्याची वेबसाइट आणि ॲप अशा दोन्ही स्वरूपात सेवा उपलब्ध आहे. तांत्रिकदृष्ट्या त्याची रचना यूट्यूबसारखीच असून, वापरकर्त्यांना विविध प्रकारचे व्हिडिओ पाहता येतात. मात्र, व्यवसायाच्या दृष्टीने ‘बिलिबिली’चे लक्ष्य प्रामुख्याने ‘जेन झी’ म्हणजेच तरुण पिढीवर आहे. ॲनिमेशन, मनोरंजन, गेमिंग आणि इतर विविध प्रकारच्या व्हिडिओंसाठी हा प्लॅटफॉर्म ओळखला जातो. येथे मोठ्या प्रमाणावर ‘यूजीसी’, म्हणजेच वापरकर्त्यांनी तयार केलेला कंटेंट उपलब्ध असतो.

ग्लोबल बाजारपेठेत उतरताना ‘बिलिबिली’ आक्रमक रणनीती स्वीकारण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. जगभरातील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स आणि ग्लोबल इन्फ्लुएन्सर्सना आपल्या प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्याची शक्यता आहे. यामुळे यूट्यूबसोबत थेट स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, भारतात ‘बिलिबिली’ लाँच होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत सरकारने २०२० नंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकसह अनेक चिनी ॲप्सवर बंदी घातली होती. त्यामुळे ‘बिलिबिली’ला भारतात व्यवसाय करण्यासाठी नियामक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. भारतात ‘बिलिबिली’ची वेबसाइट उघडण्याचा प्रयत्न केला असता ती ॲक्सेस झाली आणि व्हिडिओही प्ले करता आले. मात्र, सध्या बहुतांश कंटेंट चिनी भाषेत आहे. प्लॅटफॉर्मचा वापरकर्ता इंटरफेस यूट्यूबसारखा दिसत असून, इंग्रजी भाषांतराची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे ग्लोबल लाँचनंतर ‘बिलिबिली’ची आंतरराष्ट्रीय वाटचाल आणि भारतातील प्रवेश याकडे आता लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande