लातूर : दुचाकी चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद; २.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 25 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून मोटारसायकली चोरी करून त्यांची तोडफोड करत सुट्टे भाग भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, विविध दुचाकींचे सु
पोलीस कारवाई


लातूर, 25 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतून मोटारसायकली चोरी करून त्यांची तोडफोड करत सुट्टे भाग भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, विविध दुचाकींचे सुट्टे भाग, नंबर प्लेट, रोकड आणि तोडफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत होते. दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी हत्ते नगर परिसरातील एका घरावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत तौसिफ बादल शेख (वय २६, रा. इस्लामपूरा, लातूर; सध्या हत्ते नगर गल्ली क्रमांक ५, लातूर) हा चोरीच्या मोटारसायकलींची तोडफोड करून त्यांचे सुट्टे भाग तयार करत असल्याचे आढळून आले. हे भाग फिरस्ती भंगारवाल्यांना विक्री केले जात असल्याचे तपासात समोर आले. आरोपीकडून विविध मोटारसायकलींचे सुट्टे भाग, नंबर प्लेट, चोरीच्या दोन मोटारसायकली, मोटारसायकलींचे भाग विक्रीतून मिळालेली २ लाख ५७ हजार रुपयांची रोकड, तसेच दुचाकी तोडण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे जप्त करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपीने लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, लातूर ग्रामीण तसेच चाकूर आणि कासारशिरसी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्यातील ८, शिवाजीनगर १, लातूर ग्रामीण १, चाकूर १ आणि कासारशिरसी १, असे एकूण १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये होंडा युनिकॉर्न, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन, बजाज पल्सर, हिरो पॅशन प्रो आणि हिरो एचएफ डिलक्स आदी मोटारसायकलींचे सुट्टे भाग, पेट्रोल टाक्या, सायलेन्सर, हँडल, चाके, इंजिनचे भाग, चेसिस आणि नंबर प्लेटचा समावेश आहे. याशिवाय करवत, नट-बोल्ट, पाना, स्क्रूड्रायव्हर, हातोडी, छन्नी आणि पक्कड आदी साहित्यही जप्त करण्यात आले.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, पोलीस अंमलदार नवनाथ हासबे आदी यांच्या पथकाने केली. आरोपी तौसिफ बादल शेख याला पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande