
जळगाव, 25 ऑगस्ट, (हिं.स.) धरणगाव तालुक्यातील सावदे येथील सरपंच गोपाल पवार यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य करत मोठी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घरातून सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे पवार कुटुंबीय गावी परतल्यानंतर उघड झाले. या घटनेमुळे पाळधी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
सरपंच गोपाल पवार हे कुटुंबीयांसह राजस्थानमधील खाटू श्याम मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कुटुंबीय बाहेरगावी असल्याने सुरुवातीला चोरीतील नेमका ऐवज स्पष्ट झाला नव्हता.पवार कुटुंबीय परतल्यानंतर घराची पाहणी केली असता तिजोरी फोडल्याचे आढळून आले. तिजोरीतील २० तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे समोर आले. चोरट्यांनी तिजोरी फोडण्यासाठी घरातच असलेल्या मुसळीचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच सरपंच गोपाल पवार यांचा जबाब नोंदवण्यात आला. तपासासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. श्वान पथक घराजवळील एका गल्लीत घुटमळल्याने पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती असून त्यांची चौकशी सुरू आहे. चोरीचा तपास वेगाने सुरू असून, या प्रकरणातील आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर