अमरावती जिल्हा रुग्णालयात एजंटांचा खुलेआम वावर; प्रमाणपत्रांसाठी पैशांची मागणी
गरजू रुग्ण व नागरिकांना हेरून ‘काम करून देण्याचे’ आमिष सुरक्षा यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा सामान्य रुग्णालयात बाहेरील व्यक्ती आणि एजंटांचा वावर वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयात विविध कामा
जिल्हा सामान्य रुग्णालयात एजंटांचा सुळसुळाट


गरजू रुग्ण व नागरिकांना हेरून ‘काम करून देण्याचे’ आमिष

सुरक्षा यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा सामान्य रुग्णालयात बाहेरील व्यक्ती आणि एजंटांचा वावर वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालयात विविध कामांसाठी येणाऱ्या गरजू नागरिकांना हेरून त्यांच्याशी जवळीक साधली जाते आणि पैसे घेऊन विविध प्रमाणपत्रे अवघ्या काही मिनिटांत करून देण्याचे आश्वासन दिले जाते. मंगळवारी पाहणीदरम्यान अशा प्रकारचे प्रकार उघडकीस आले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक चांगली कामे सुरू असली, तरी त्याचवेळी काही गैरप्रकारही सुरू असल्याचे निदर्शनास आले. हे प्रकार पडद्याआड न राहता रुग्णालयाच्या परिसरात उघडपणे सुरू असल्याची माहिती मिळाली.

रुग्णालयातील ओपीडी साधारण सकाळी ९ वाजता सुरू होते आणि दुपारी १ ते १.३० वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी केली जाते. ओपीडी सुरू झाल्यानंतर सुमारे तासाभराने नोंदणी कक्षासमोर रुग्ण आणि नातेवाइकांची गर्दी वाढते. याच वेळी पाच ते सहा खासगी व्यक्ती एकामागोमाग रुग्णालयात प्रवेश करत असल्याचे आढळून आले.

चिंताग्रस्त चेहऱ्यांवरून नागरिकांची गरज ओळखून हे एजंट त्यांच्याशी संपर्क साधतात. ‘साहेब, तुम्हाला काय हवे?’, ‘ताई, तुमचे काम आम्ही करून देतो,’ अशी आश्वासने देत काही वेळ चर्चा केली जाते. त्यानंतर थेट पैशांची मागणी केली जाते. ‘काही खर्चापाणी करावे लागेल,’ असे सांगून संबंधित व्यक्तीची आर्थिक तयारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

मंगळवारी या प्रकाराची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका एजंटने पत्रकाराच्या छायाचित्रकाराशी संपर्क साधून त्याला काय काम आहे, अशी विचारणा केली. फिटनेस प्रमाणपत्र हवे असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित एजंटने त्यासाठी ६०० रुपये लागतील, असे सांगितले.

यानंतर त्याने छायाचित्रकाराला ओपीडीबाहेर नेऊन दुसऱ्या व्यक्तीची ओळख करून दिली. या व्यक्तीने फिटनेस प्रमाणपत्रासाठी १ हजार रुपये दिल्यास १५ ते २० मिनिटांत काम करून देण्याचे सांगितले. स्वतःहून प्रक्रिया केल्यास १३ ते १४ चाचण्या कराव्या लागतील, अशी भीतीही दाखविण्यात आली.

छायाचित्रकाराकडून ओपीडी कार्ड काढून घेण्यात आले. त्यानंतर सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली. मात्र, अखेरीस त्याने कोणतेही पैसे न देता तेथून निघून जाणे पसंत केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षा महामंडळाचे सुरक्षारक्षक तैनात आहेत. याशिवाय एका खासगी एजन्सीचे सुरक्षारक्षकही येथे कार्यरत आहेत. रुग्णालयात बाहेरील व्यक्ती आणि एजंटांचा नियमित वावर असल्याची कल्पना असूनही त्यांना हटकले जात नसल्याचे दिसून आले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande