अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा रुग्णालय हस्तांतरणाचा पेच कायम
तीन मोठी रुग्णालये अद्याप वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित नाहीत अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळून दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. महाविद्यालयासाठी ५० टक्के पदनिर्मितीही करण्यात आली आहे.
मान्यता मिळूनही संलग्नीकरण रखडले; तीन रुग्णालयांबाबत अधिष्ठांतांची नाराजी


तीन मोठी रुग्णालये अद्याप वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित नाहीत

अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळून दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. महाविद्यालयासाठी ५० टक्के पदनिर्मितीही करण्यात आली आहे. मात्र, शहरातील तीन प्रमुख रुग्णालये अद्याप वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आलेली नसल्याने हा तिढा कायम आहे.

अमरावती शहरातील संदर्भसेवा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) आणि जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) ही तीन प्रमुख रुग्णालये आहेत. डफरीन आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयांच्या स्वतंत्र नवीन इमारतीही उपलब्ध आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाल्यानंतर ही रुग्णालये महाविद्यालय प्रशासनाकडे सोपविण्यात यावीत, अशी मागणी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत यांनी संबंधित विभागाकडे केली आहे. मात्र, वरिष्ठ स्तरावरून अद्याप निर्णय झालेला नसल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे.

महाविद्यालयासाठी डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य आवश्यक पदांची निर्मिती करण्यात आली असली, तरी रुग्णालये महाविद्यालयाशी संलग्न नसल्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा उपयोग गरजेनुसार इतर रुग्णालयांमध्ये दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येत आहे.

मूलभूत सुविधांचा अभाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन दोन वर्षे झाली असतानाही ऑपरेशन थिएटर, प्रशस्त सेमिनार हॉल, ऑडिओ-व्हिडिओ सुविधा, ओपीडी तसेच डॉक्टरांना पदानुसार बसण्याची व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. पदव्युत्तर (एमडी) शिक्षण सुरू करण्यासाठी या सुविधा अत्यावश्यक असल्याचे महाविद्यालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तिन्ही रुग्णालये महाविद्यालयाशी संलग्न होणे शक्य नसले, तरी किमान दोन रुग्णालये संलग्न झाली असती तर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि सध्या उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले असते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. नंदकिशोर राऊत म्हणाले की, रुग्णालयांचे हस्तांतरण आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा प्रश्न लवकर मार्गी लागल्यास वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक तसेच वैद्यकीय सेवांना अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande